पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/228

हे पान प्रमाणित केलेले आहे.

या युद्धाचा निकाल लागण्यापूर्वी भारताशी कोणताच करार न करणे बरे. म्हणून निजामाची चालढकल की वाटाघाटींची संधी द्या. वाटाघाटींना संधी देण्याच्या आत भारताच्या फौजा काश्मीरमध्ये जाऊन पोहोचल्या पाहिजेत, या फौजा पोचल्या आणि श्रीनगरच्या बाहेर पुंच येथे भारत-पाकिस्तानची पहिली लढाई जुंपली. तेव्हा सरदारांनी निजामाला कळविले की आता आम्हाला विचाराला पंधरा दिवस लागतील. याच दरम्यान जुनागढने पाकिस्तानात विलीन व्हायचे ठरविले आहे. पाकिस्तानने ते विलीनीकरण मान्यही केले आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानची लढाई चालू असतानाच जुनागढवर सैन्य पाठवून पोलिस कारवाई करावयाचे ठरविले. सहा नोव्हेंबरला पोलिस कारवाई ठरली. आठ नोव्हेंबरला जुनागढच्या हद्दीवर फौजा उभ्या राहिल्या. नऊ नोव्हेंबरला पोलिस कारवाई संपली. अकरा नोव्हेंबरला काश्मिरात पाकिस्तान सैन्याची पिछेहाट सुरू झाली. पाकिस्तानने भारतीय भूमीवर हल्ला करताच भारताला पाकिस्तान भूमीवर जुनागढला हल्ला करणे साहजिकच झाले. भारताने चाल केली तिथे भारत जिंकले. पाकिस्तानने चाल केली तिथेही भारत जिंकला. तेव्हा मध्य सरकारच्या संस्थान मंत्रालयातून मेनननी कळविले की वाटाघाटी मोडल्या असे जाहीर झाले तर परिणाम अत्यंत गंभीर होतील. तेव्हा काय करता ते कळवा. त्यावर निजामाने अशी चाल केली की; इथल्या दंगलीच्यामुळे मंत्रिमंडळ बदलले आहे. (नबाव ऑफ छत्तारीला घेरणे, त्याच्या मिश्या उपटणे, त्या जाळणे, अलियावर जंगला मारणे अशा घटना झाल्या होत्या.) तेव्हा मागे काय ठरले हे समजून घेण्यासाठी नवे मंडळ दिल्लीला पाठवीत आहे. म्हणून लायकअली यांच्या नेतृत्वाखालील मंडळ गेले. आता आमची समजूत पटली. आम्ही जैसे थे करारावर सही करावयास तयार आहोत म्हणून सह्या करायचे ठरले आणि एकोणतीस नोव्हेंबरला 'जैसे थे' करारावर सह्या झाल्या. या सह्यासुद्धा निजामाने काश्मीरमध्ये पाकिस्तानचा नक्की पराभव होतो आहे हे स्पष्ट झाल्यावर व आपण मस्ती केली तर जुनागढप्रमाणे हैदराबादमध्ये सैन्य येईल ही भीती वाटल्यावरच केल्या. अजूनही त्याने एक व्याप पार पाडला. पाकिस्तानला विचारले, हैदराबादवर हल्ला झाला तर तुम्ही मदत कराल का? पाकिस्तानने अधिकृतरीत्या कळविलेले आहे की आपण तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. पाकिस्तान मदत करणार नाही हे कळल्यावर भारत सरकार जुनागढप्रमाणे सैन्य पाठवील हे कळल्यावर आणि काश्मिरात पाकिस्तानचा पराभव झाल्यावर निजामाने 'जैसे थे'

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२३०