पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/232

हे पान प्रमाणित केलेले आहे.

संपूर्ण सार्वभौमत्व होते. ते अधिकार कायद्याने नव्या भारत सरकारच्या स्वाधीन झालेले आहेत, हे आपण नाकारता काय? जुन्या ब्रिटिश इंडियाच्या व्हाइसरॉयला, राजाला पदच्युत करण्याचे, संस्थान खालसा करण्याचे अधिकार होते हे तुम्ही नाकारता काय? संस्थानात फौजा नेण्याचे अधिकार ब्रिटिश सरकारला होते, हेही तुम्ही नाकारता काय? शस्त्रे घ्यावयाची असतील तर ती कोणत्याही राष्ट्राचे निजामाशी संबंध भारत सरकारच्या मर्जीने व त्याच्या मार्फतच राहावे लागतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्याचा हा जो भाग पंडित नेहरूंनी अट्टाहासाने घडवून घेतला त्यावर तुमच्या आमच्या सह्या आहेत हे ॲटलीने चर्चिलला पटविले. अशा अवस्थेत आपला हैदराबादशी आता संबंध नाही असे ॲटलीने म्हटल्यावर चर्चिलकडे उत्तर नव्हते. निजाम, चर्चिल आणि उपद्व्यापी जग यांच्यावर नेहरूंनी आधीच मात करून ठेवलेली होती. चर्चिलकडे उत्तर नसल्याने ‘सरकार हटवादी आहे' असे म्हणून त्याने सभात्याग केला. त्यानंतर हैदराबादचा प्रश्न ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कधीच निघाला नाही.

 पंडित नेहरूंनी हे जे उद्योग मुत्सद्दीपणाने आणि दूरदर्शीपणाने गुपचूप केले आहेत, त्यामुळे जगातील कोणत्याही राष्ट्राला हैदराबादला सैन्य/शस्त्रे पाठविणे अधिकृतपणे शक्य नाही. ते भारत सरकारच्या व्दारेच पाठविली जाऊ शकतात. इंग्लंडमधून निजामाला मदत जात नाही हे पाहण्याची जबाबदारीच ब्रिटिश सरकारची होती. दुसऱ्या कोणत्या मार्गाने जर हैदराबादमध्ये शस्त्रास्त्रे जाणार असतील तर तेही हाणून पाडणे हेही काम ब्रिटिश सरकारवर आलेले होते. त्यामुळे इंग्लंड अडकून पडले. चर्चिलला सभात्यागाने प्रतिष्ठा सांभाळावी लागली. तुर्कस्तान, इराण, सौदी अरेबिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, पोर्तुगाल, झेकोस्लोव्हाकिया इतक्या देशांमध्ये निजामाने शस्त्रास्त्रांची मागणी केली. पण ती शस्त्रास्त्रे हैदराबादला पोचायला अधिकृत मार्गच नव्हता. हा पंडित नेहरूंचा शहाणपणा.

 सामान्यत्वे आपली पद्धत अशी आहे की, ज्यांनी आपल्या देशार्थ जीवन घालविले त्यांना स्वातंत्र्याविषयी आस्था नाही असे आपण मानतो व ज्याचा आपला स्वातंत्र्याशी काही संबंध नाही त्यांचा स्वातंत्र्यावर हक्क जास्त आहे असे आपण मानतो. ज्यांनी राजकारणासाठी बुद्धीचा यज्ञ केला त्यांना बुद्धीच नाही असे आपण घरबसल्या म्हणतो. पंडित नेहरू अशा अनधिकारी टीकेचे अनेकदा बळी झाले आहेत. अशी टीका करण्यापूर्वी त्यांनी किती सुबुद्ध दूरदर्शीपणाने हा प्रश्न सांभाळला होता याचा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२३४