पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/26

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 वाटण्याचे कारण काय?

 १७ सप्टेंबर १९४८ ला पोलिस अॅक्शन झाली व हैदराबाद भारताचा अविभाज्य भाग झाला. यानंतर क्रमाने भाषावार प्रांतरचनेची मागणी जोर धरीत राहिली. हैदराबादचे विभाजन व्हावे व भाषावार प्रांत बनावे या भूमिकेचा आग्रही पुरस्कार करण्यात मराठवाडा पुढे होता. भारतीय नेत्यांच्यापैकी पं. नेहरू हैदराबादच्या विभाजनाला प्रतिकूल होते हे एक उघड गुपित आहे. मराठवाडा जवळजवळ एकमुखी महाराष्ट्रवादी राहिला नसता तर महाराष्ट्र अस्तित्वात आला नसता. मराठी भाषिकांचे दोन प्रांत अस्तित्वात आले असते हेही उघड गुपित आहे. आपण जर अटी घालीत बसलो तर महाराष्ट्र अस्तित्वात येणारच नाही म्हणून मराठवाड्याच्या एका पिढीचा सत्यानाश झाला तरी चालेल पण महाराष्ट्र हवा ही आग्रही भूमिका आम्ही घेतली. आपण नुसते महाराष्ट्राचे घटक नाही तर निर्माते आहो अशी आमची भूमिका आहे, या भूमिकेची कुणी बूज ठेवली नाही हा प्रश्न अलाहिदा. पण आम्हाला असे वाटतेच की आपली ही कष्ट भोगण्याची तयारी हा अभिमानास्पद ठेवा आहे. आम्ही बिनशर्त महाराष्ट्रवादी होतो. ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी आपले राजकीय अस्तित्व संपवून ती तयारी ठेवून महाराष्ट्र जन्माला घातला.

 बिनशर्त महाराष्ट्रात जाणे म्हणजे काय याची थोडीफार कल्पना आम्हाला होतीच. हैदराबाद 'ब' गटातील प्रांत होता. उर्वरित महाराष्ट्र 'अ' गटातील प्रांत होता. 'ब' प्रांतातील तीन वर्षाची सेवा म्हणजे 'अ' गटातील दोन वर्षांची सेवा. या नियमामुळे मराठवाड्यातील मंडळींची सेवाज्येष्ठता गेली. उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसल्यामुळे अनेक वकिलांचे धंदे बसले. राजकारणात तर सर्व जुन्या नेत्यांना निवृत्तच व्हावे लागले. हे व असे अनेक परिणाम मराठवाड्यातील मंडळींना भोगावे लागले. आज याही गोष्टी जुन्या झालेल्या आहेत. त्या उगाळीत बसण्याची आमची इच्छा नाही.

 मराठवाड्यात कर्तृत्व भरपूर. बौद्धिक क्षमताही भरपूर आहे. पूर्वी निजामाचे राज्य चालू असताना दिवाकर कृष्ण, नांदापूरकर, बी. रघुनाथ यांच्यासारखे साहित्यक्षेत्रातील नेते आमच्याकडे झाले. आज कान्त; महानोर तीच परंपरा चालवीत आहेत. सर्व महाराष्ट्रात ज्यांच्याविषयी आकर्षण आहे असे वाङ्मयाचे नेते मराठवाड्यात आहेत.

 मग आमची तक्रार कोणती आहे? तक्रार इतिहासाविषयी नाही. ती वर्तमानकाळाविषयी आहे. मराठवाडा सर्व महाराष्ट्राचे धान्यकोठार होण्याची क्षमता

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / २३