पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/40

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अली निजाम झाले त्यावेळी हैदराबाद संस्थानात प्रशासनाच्या दृष्टीने पुरेशी अव्यवस्था आणि गोंधळ मोठ्या प्रमाणात होता. मागासलेपण हे तर होतेच पण त्या मागासलेपणाच्या जोडीला सर्वांगीण अव्यवस्था हाही महत्त्वाचा भाग होता. या अव्यवस्थेला पायबंद घातल्याशिवाय आणि सामाजिक जीवनाचे मागासलेपण संपू न देता प्रशासन व्यवस्थित करणे ही निजामाची पहिली इच्छा होती. म्हणून हैदराबादच्या इतिहासात काही काळ तर असा आहे की ज्यावेळी हैदराबादला मंत्रिमंडळच नव्हते. स्वतः निजामच सर्व कारभार सांभाळीत असत. निजामाचा विचार करताना आपल्या डोक्यात बडोद्याचे सयाजीराव महाराज किंवा कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा विचार येणे बरोबर नाही. कारण गायकवाड़ व शाहू महाराज यांचे गुणदोष कोणतेही असले तरी त्यांच्यासमोर प्रजेचे कल्याण हा प्रमुख प्रश्न होता. निजामाच्या समोर प्रजा हा मुद्दा नव्हता. हिंदू प्रजेच्या कल्याणाचा विचार त्याने कधी केला नाही. पण मुस्लिम प्रजेच्याही कल्याणाचा विचार त्याने कधी केला नाही. निजामाचे ध्येय मुसलमानांचे कल्याण हे नव्हते. नाही तर भारतीय राष्ट्रवादाला निजाम हा अधिक मोठा धोका सिद्ध झाला असता. निज़ामासमोरचा प्रश्न स्वतः स्वतंत्र सार्वभौम राजा होण्याचा आणि त्यासाठी हैदराबाद हे राष्ट्र करण्याचा होता. या हेतुसिद्धीसाठी कोणतीही साधणे वापरण्याची त्याची तयारी होती. धर्मवेड त्याच्याजवळ नव्हते असे नाही. पण ते धर्मवेड मर्यादित होते. मुख्य वेड सम्राट होण्याचे होते. साधन म्हणून त्यासाठी धर्म वापरण्याची त्याची तयारी होती. आरंभापासूनच निजामाच्या डोक्यात सार्वभौम राजा होण्याचे स्वप्न पक्के मनात घर करून बसलेले होते. निजामाचे म्हणणे असे की इंग्रज भारताचे स्वामी होण्यापूर्वी हैदराबाद संस्थान एक स्वतंत्र राष्ट्र होते. नंतर वेळोवेळी इंग्रजांशी आमच्या पूर्वजांनी तह केले. हे तह दोन मित्रांच्यामधील तह आहेत. ते तह आम्ही पाळू, करारातील प्रत्येक अट प्रामाणिकपणे पाळू- पण दोन मित्रांच्यामधील करारामुळे आपण मांडलिक असल्याचे सिद्ध होत नाही. उलट करार करणारे दोन पक्ष यांतील एक पक्ष जर स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असेल तर दुसराही पक्ष स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र असणार हे उघड आहे. हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र आहे ही गोष्ट परंपरासिद्ध आणि करारांनी मान्य झालेली आहे. आणि म्हणून स्वतंत्र राजाप्रमाणे आपल्यालाही हिज मॅजेस्टी अशी पदवी लावण्याचा हक्क आहे. इंग्रजांनी निजामाचा हा दावा फेटाळून लावला हे जरी खरे असले तरी त्यामुळे इ.स. १९२६ सालापासून आणि त्याही पूर्वीपासून निजाम

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ३७