पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/44

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरहद्द गांधी आणि शेख अब्दुल्ला यांच्या उदयामुळे गांधीजी अधिक बलवान झाले आणि आता हैदराबाद संस्थानच्या प्रश्नाला हात घातला पाहिजे असे त्यांनी ठरवले. हैदराबादच्या काँग्रेस राजकारणाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन इ.स. १९४५ पर्यंत व्यक्तिशः गांधीजींकडे होते. गांधीजींनी १९३७ अखेर हैदराबाद संस्थानात राजकीय आंदोलन संघटित करण्याला अनुमती दिली. यामुळे हैदराबाद स्टेट काँग्रेस इ.स. १९३८ साली अस्तित्वात आली. हैदराबादच्या राकारणाचा एक दुवा यामुळे स्पष्ट होतो.

 हैदराबाद संस्थान हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते. त्याकाळी एक कोटी चौसष्ट लक्षांच्या आसपास या संस्थानची लोकसंख्या होती. याहून कमी लोकसंख्येचा प्रदेश जगात सार्वभौम राष्ट्र म्हणून नांदत आहेत. या हैदराबादचे स्वतंत्र राष्ट्र करावे ही कल्पना निजामाच्या डोक्यात आली असती तर त्यात नवल वाटण्याजोगे काहीच नव्हते. हैदराबाद संस्थानाचे एकूण सोळा जिल्हे होते. स्थूलपणे आठ जिल्हे तेलगू भाषिक, पाच मराठी भाषिक आणि तीन कानडी भाषिक अशी या संस्थानची रचना होती. पण या स्थूल परिचयापेक्षा हैदराबादचा इतर सूक्ष्म परिचय जास्त महत्त्वाचा आहे. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट अशी की सर्व संस्थानभर जहागिरीचे निरनिराळे प्रदेश होते. यातील सर्वांत मोठी जहागीर व्यक्तिशः निजामाची, जिचे उत्पन्न निजामाची वैयक्तिक मालकी होती तिला सरफे खास म्हणत. याखेरीज लहानमोठे हिंदू व मुसलमान जहागीरदार होते. मोठ्या हिंदू जहागीरदारांत किशनप्रसाद, राजे राय रायान, राजा वनपार्ती, इंद्रकरण इत्यादी प्रमुख होते. मुस्लिम जहागीरांत सालारजंग सर्वांत प्रमुख होते. संस्थानचा एक तृतीयांश प्रदेश जहागीरदारीने व्यापलेला होता. शिवाय तेलगू प्रदेशात मोठमोठे जमीनदार होते, परंपरेने चालत आलेले सरदेशमुख, देशमुख, देशपांडे, सरदेशपांडे, इजारदार, महाजन अशा वतनदारांचीही खूप मोठी संख्या होती. सर्व संस्थान एका सरंजामशाही युगात वावरत होते, परंपरागत चालत आलेले जीवन, सर्व चालीरीती, रूढी या संस्थानात पुरेपूर होत्या. वेठबिगार चालू होती. अस्पृश्यता बिनतक्रार सर्वत्र पाळली जाई. पुरुषच गुलाम होते मग स्त्रीदास्य तर होतेच. अठराव्या शतकातील भारताचे सर्व वातावरण जवळपास इ.स. १९४० पर्यंत हैदराबाद संस्थानात होते.

 याबाबतीत अगदी साध्यासुध्या अशा दोन गोष्टी मी नमूद करू इच्छितो. माझी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४२