पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/52

हे पान प्रमाणित केलेले आहे.

निःशस्त्र प्रतिकार आंदोलन सुरू केले. हिंदू महासभेच्या या आंदोलनात हिंदू महासभेचे सत्याग्रही म्हणून जे गेले त्यांच्यातील पुष्कळजण पुढे काँग्रेसच्या कार्यात सहभागी झाले. हैदराबाद संस्थानात हिंदू महासभेचे कार्य फारसे कधीच वाढू शकले नाही. पण वाय. डी. जोशी, रामचंद्रराव यांच्यासारखे काही ध्येयवादी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते या आंदोलनातून उभे राहिले.

 आर्यसमाजाची मागणी आपल्यावरील आक्रमणाची चौकशी आणि उपासना स्वातंत्र्य ही होती. हिंदू महासभेची मागणी हिंदूंच्यावरील आक्रमण थांबवण्यात यावे ही होती. विद्यार्थ्यांची मागणी वंदे मातरम् म्हणण्याचा हक्क प्रस्थापित करणे इतकीच होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसची मागणी प्रामुख्याने राजकीय होती. त्यांना निवडणुकीवर आधारलेली विधानसभा आणि जनतेला जबाबदार असणारे मंत्रिमंडळ हवे होते. हैदराबाद संस्थानात लोकशाहीची प्रक्रिया सुरू व्हावी अशी स्टेट काँग्रेसची मागणी होती. जनतेच्या राजकीय हक्कांचा पुरस्कार करण्यासाठी एक राजकीय संघटन सुरू करण्याचा मनोदय स्टेट काँग्रेसचा होता. ही संघटना स्थापन होण्यापूर्वीच निजामाने तिच्यावर बंदी घातली. पण त्याही अवस्थेत स्टेट काँग्रेस स्थापन केल्याचे जाहीर करण्यात आले. गोविंदराव नानल हे या स्टेट काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. हैदराबाद स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवा यासाठी काँग्रेसने आंदोलन सुरू केले. सुमारे नऊशे सत्याग्रही तुरुंगात गेलेले असताना महात्मा गांधीनी आदेश देऊन हा सत्याग्रह स्थगित केला.

 स्टेट काँग्रेसने आपला सत्याग्रह एकाएकी स्थगित करावा ही गोष्ट कुणालाच आवडली नाही. स्टेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनासुद्धा गांधीजींच्या निर्णयाबद्दल अतिशय असमाधान होते. हिंदू महासभा आणि आर्यसमाजाच्या नेत्यांनी तर गांधीजींची ही स्थगिती म्हणजे जनतेचा विश्वासघात अशी भूमिका घेतली. आज आपण इतक्या दीर्घ काळानंतर गांधीजींच्या या निर्णयाचे अवलोकन करू लागलो म्हणजे असे वाटते की गांधीजींचा निर्णयच बरोबर होता. आंदोलनातून कार्यकर्ते तयार करायचे आणि कार्यकर्त्यांची हिंमत संपण्याच्या आत आंदोलन मागे घ्यायचे. मिळालेली शक्ती संघटित करून पुन्हा आंदोलनाचा आरंभ करायचा ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. या प्रक्रियेत गांधीजी वाकबगार होते. इ. स. १९३८ साली गांधीजी सत्याग्रह मागे घेतात आणि इ. स. १९४५ साली हैदराबाद संस्थानभर काँग्रेस संघटना एक बलवान

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ५०