पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/60

हे पान प्रमाणित केलेले आहे.






५.
एक राजकारणी संन्यासी - स्वामीजी

 २२ जानेवारी १९७२ ला तीन वाजता पू. स्वामी रामानंद तीर्थ ह्यांच्या निधनाने एक कृतार्थ जीवनाचा पूर्ण विराम झालेला आहे. सुदृढ प्रकृती हे स्वामीजींचे वैशिष्ट्य कधीच नव्हते. आणि गेले तीन महिने तर ते अंथरुणाला खिळूनच होते. पण मानवी शौर्याचा उगम बळकट शरीरापेक्षा बळकट मनावर जास्त अवलंबून असतो. स्वामीजी मनाने नेहमीच निर्भय आणि स्वभावतः निर्लेप होते. तीन-चार दिवसांपूर्वीच त्यांनी औषधांचा, तज्ज्ञ डॉक्टरांचा आणि सुसज्ज रुग्णालयाचा धैर्याने शेवटचा निरोप घेतला. जर शरीर साथ देणारच नसेल तर इतरांच्यावर ‘निष्कारण ओझे' म्हणून जगण्याची त्यांची इच्छा नव्हती. वीर पुरुषाप्रमाणे जाणीवपूर्वक मृत्यूला सामोरे जाऊन त्यांनी स्वतःच्या निःस्पृहतला साजेल अशा गतीची प्राप्ती करून घेतली. राजकारण कधी कृतज्ञ नसते. तसे महाराष्ट्राचेही राजकारण कृतज्ञ नाही. पण कृतज्ञता हा मानवी मनाचा विशेष आहे. राजकारणाच्या स्वार्थी रंगाने सर्वांचीच मने रंगलेली नसतात. त्या साऱ्यांना स्वामीजी आपल्या मुक्ततेची शुभ देवता होते ही गोष्ट कधी विसरता येणार नाही. स्वामीजींच्या प्रसन्न, कृतार्थ आणि निरिच्छ व्यक्तिमत्त्वाने ज्या हजारो, लाखोंच्या जीवनात कर्तृत्वाने अंगार फुलविले त्यांना ही कृश मूर्ती आज कायमची नजरेपुढून मालवली आहे याची हळहळ वाटल्याविना राहणार नाही. स्वामीजी मान्यतेच्या शिखरावर असताना कधी अहंकारी व उर्मट झाल्याची आठवण कुणी सांगू शकणार नाही. देव्हाऱ्यातून दूर फेकले गेल्यानंतर जो कुढेपणा, किरविरेपणा देवमूर्तीत निर्माण होतो तोही त्यांच्या ठिकाणी कुणी पाहिली नाही. ती एक समर्पित ओंजळ होती

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ५८