पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/61

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि समर्पणाच्या बेभान अवस्थेतच तृप्त होती. कुणाला काही मागण्याची ज्यांना क्षुद्र बुद्धी नसते त्यांना हक्काचे काही हिरावले गेल्याचा विषादही नसणे स्वाभाविकच होते.

 एक दिवस कोणतीही अपेक्षा न करता जीवनसर्वस्व पणाला लावण्याचे ठरवून एक तरुण मुलगा उस्मानाबाद जिल्ह्यात हिप्परगा या शाळेत येऊन, शिक्षक म्हणून दाखल झाला. त्याचे नाव व्यंकटेश खेडगीकर. आपण हैदराबादच्या संस्थानी जनतेच्या भाग्याचे विधाते आहोत ह्याची जाणीव त्यावेळी त्यांना अगर इतर कुणाला असण्याची शक्यता नव्हती. एक ध्येयवादी तरुण शिक्षक, एक गांधी-टिळकांचा अनुयायी असणारा तरुण यापलीकडे त्यांना कुणी ओळखीत नव्हते. शिक्षण-संशोधन वैचारिक सेवेची साधने निर्माण करणे व वैचारिक कार्याबद्दल आस्था बाळगणे ही स्वामीजींची कायमची प्रवृत्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा अखंड धागा जीवनाच्या आतापर्यंत अतूट होता. स्वामीजींचे सगळे विचार कुणाला पटतील असे नव्हते. चारित्र्यवान ध्येयवादी मनाने केलेला विचार नेहमीच ‘सत्यदर्शक' असेल अशी हमी कोणी द्यावी? पण विचारांच्या विषयीची आस्था मात्र प्रामाणिक होती.

 पण त्यांचा योग राजकीय नेते होण्याचा होता. ज्या हैदराबाद संस्थानात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्याच प्रकारचे मागासलेपण होते तेथील कार्य अनेक बाजूंनी व अनेक पटींनी अवघड आणि किचकट होते. हैदराबाद संस्थान हे एक मुस्लिम संस्थान असल्यामुळे त्यावेळच्या राजकारणात ते अवघड जागेचे दुखणे होते. कोणतीही राजकीय मागणी असली तरी तिच्यावर हिंदू जातीयवादाचा शिक्का मारणे सोपे होते व बाहेरून अशा वेळी समर्थन प्राप्त होण कठीण असे. संस्थानी राजवटीत वीस लक्ष मुसलमानांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे आक्रमक जातीयवादाच्या चौरस वातावरणात अत्याचार सहन करीतच काम करणे भाग होते. आणि दीर्घकाळच्या मागासलेपणामुळे बहुसंख्य जनता इतकी प्रतिकारशून्य झाली होती, की त्यांना लढ्याची कल्पनाच सहन होत नसे. अशा त्या वातावरणात चारित्र्य, धैर्य आणि बलिदानाची सिद्धता हेच राजकारणाचे आधार होते. अशा राजकारणाचा नेता फक्त संन्यासीच होऊ शकतो तसा तो झाला! आपला संसार मोडण्याची गरज न भासलेल्या ह्या कृश, कषाय-वस्त्र-धाऱ्यावर कोट्यवधींच्या संसाराची नवी मांडामांड करण्याचे ऐतिहासिक कर्तव्य येऊन पडले होते. या लढ्यात विजयी झाल्याशिवाय जातीयवादाचा गंड कोसळणार नव्हता. भारत सलग होणार नव्हता व लोकशाहीलाही भवितव्य नव्हते.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ५९