पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/63

हे पान प्रमाणित केलेले आहे.






अध्यात्मवादी स्वातंत्र्याचे उपासक - स्वामी रामानंद तीर्थ

 कै. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ हे स्वामी म्हणजे संन्यासी होते व हैदराबाद संस्थानचे राजकीय नेते होते. संन्यासी हा त्याग, वैराग्य, अनासक्ती यांचा प्रतिनिधी असतो. राजकारणाचे स्वरूप याहून भिन्न असते. काहीजणांना यात विसंवाद वाटतो. संन्याशाने प्रपंचात मन कशाला घालावे? प्रपंचातील प्रश्नांचा मोह सुटत नसेल तर संन्यास तरी कशाला घ्यावा? संन्याशाचे जीवन तपस्वी, क्षमाशील व भोगातीत असले पाहिजे. या जीवनदीक्षेला राजकारण ही वाव विसंगतच मानणे भाग आहे. कारण परलोकातील मोक्षाचा पाठपुरावा करणारा संन्यासी आणि इहलोकातील प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी झटणारा राजकारणी यांचे रस्तेच भिन्न असले पाहिजेत. एका व्यक्तीच्या जीवनात जर या दोन बाबी एकत्र दिसत असतील तर तो विसंवाद आहे, असे काहीजणांना वाटते. आणि या वाटण्यात अर्थ आहे. माणसांना एक विशिष्ट बाब विशिष्ट त-हेने जाणवत असेल तर त्यामागे परंपरा असते. फार मोठी परंपरा अशी आहे की, साधुसंत प्रपंचाच्या प्रश्नांच्या बाबतीत उदासीन राहिले. आम्हाला व्यवहार हा परमार्थाहून निराळा आणि परमार्थ व्यवहाराहून निराळा समजण्याची सवय लावली आहे.

 गृहस्थाश्रम हा व्यवहारधर्माचा आधार आहे. हा आश्रम वैराग्याचा नव्हे. कारण पत्नी आहे. तिच्याविषयीची कर्तव्ये आहेत. परंपरेत पत्नीच्या संख्येला बंधन नाही, परंपरेनुसार पत्नीखेरीज उपपत्नीही विहित आहेत. मुलेबाळे आहेत. त्यांच्या संगोपनाचा, जपणुकीचा प्रश्न आहे. म्हणून जायदाद व संपत्ती मिळविणे आले. मित्रांना

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ६१