पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/78

हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वीकारल्यावरोवर आतील ठाणी सोडून देणे भाग होते. त्याप्रमाणे गावे सोडून दिली.

 त्याचवेळी आमचा एक कार्यकर्ता सुदाम पकडला गेला. त्याला पकडून कुरुंद्याला आणण्यात आले व कुरुंदा ठाण्यात त्याचा छळ सुरू झाला. ह्या छळाच्या वेळी गावचे पाटील पुष्कळदा उपस्थित असत. आणि निष्कारण छळ सहन करण्यापेक्षा नावे सांग व जीव वाचव म्हणून उपदेश करीत. त्या छळाच्या काळात सुदाम कधी हे म्हणाला नाही, की पाटील तुमच्या मळ्यात आमचे केंद्र आहे व तुम्हीच आम्हाला जेवण पुरवता. त्याने त्याच पाटलाकरवी आम्हाला पळण्याचे निरोप केले व सर्व व्यवस्था लागल्यानंतर, आम्ही फरार झाल्यानंतर आमची नावे सांगितली. त्यामुळे माहिती मिळणारी सगळी यंत्रणाच कोसळली. मी हैदराबादला फरार झालो. तिथेच पोलिस अॅक्शनपर्यंत किरकोळ कामे करीत होतो. निघण्यापूर्वी गावकरी मंडळीना मी हे तपशिलाने समजावून सांगितले की, आता निजाम व रजाकारांचा घडा भरला आहे. सरहद्दीवर भारतीय फौजा जमू लागल्या आहेत. ह्यानंतर क्रमाने वेढा पक्का होत जाईल आणि नंतर भारतीय फौजा हैदराबादेत शिरतील आणि ह्या अत्याचारांचा शेवट होईल. आता तुम्ही फक्त वाट पाहा. काही करू नका. शासनाच्या आज्ञा निमूटपणे पाळा, धीर सोडू नका.

 जुलैपासून मौजे कुरुंदा जगापासून जवळपास तुटल्यातच जमा होते. पावसाळा असल्यामुळे गावकऱ्यांचे बाहेर जाणे येणे मंदावलेलेच होते. गावातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग होते. त्यावर एक पोलिस व दहा पंधरा रझाकार ह्यांचे टाणे असे. गावात येणारा व गावातून जाणारा ह्यांची ते कसून तपासणी करीत. त्यामुळे होता होईतो लोक बाहेर गावी जाण्याचे टाळीत. चिखलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसाळा संपेपर्यंत गाड्या चालणे शक्यच नव्हते. गावात संस्थानाबाहेरचे मराठी वर्तमानपत्र येतच नसे. आमची यंत्रणा संपल्यामुळे स्टेट काँग्रेसची बातमीपत्रे येईनात. कार्यकर्ते सरहद्दीवर अडकले होते तेही इतक्या आत येत नव्हते. अमीनसाहेबांनी (सब इन्स्पेक्टर पोलिस) सर्व टपाल तपासून मगच देण्यास आरंभ केला. ह्या बेकायदेशीर सेन्सॉरमुळे राजकीय बातमी कळणेच कठीण झाले. कुणालाही कशाची जाणीव नाही. त्यामुळे साऱ्या हालचाली थंड झाल्या असे वातावरण निर्माण होई. हे वातावरण निराश करणारे होते.

 जुलैनंतर क्रमाने जनतेत निराशा वाढत गेली. बाहेर काय घडत आहे ह्याबाबत अमीनसाहेब प्रमुख गावकऱ्यांना सायंकाळी बोलावून घेऊन माहिती सांगत. गावात रेडिओ दोनच होते. सर्वांना बातम्या कळणे सोयीचे व्हावे म्हणून पाटलांचा रेडिओ

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७७