पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/80

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विषय होता.

 एक कार्यकर्ता गावात ठाण्यात अडकलेला होता. त्याचा छळ, अपमान रोज डोळ्यांसमोर होई. मधेच बहिर्जी हा जवळच्या गावचा कार्यकर्ता हुतात्मा झाल्याची बातमी आली, कोण जिवंत आहेत, कोण ठार झाले हे नक्की कळत नव्हते. त्याचीही चिंता होतीच.

 पण हिंदूंच्यासह मुसलमानही घाबरलेले होतेच. कारण त्यांनाही काही गोष्टी समजत नव्हत्या. पैकी एक न समजणारी गोष्ट काश्मीर होती. तिथली प्रजा मुसलमान. पाकिस्तान तिथे लढत आहे. त्याचा पराभव का व्हावा? पाहता पाहता जुनागढ भारतीय फौजांनी जिंकले, पचविले. त्याबाबत पाकिस्तान काही का करू शकले नाही? हैदराबादला जैसे थे करारावर सह्या का कराव्या लागल्या? हिंदूंच्यामध्ये ज्याप्रमाणे मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या कत्तलीच्या कहाण्या लोकप्रिय होत्या व घबराट निर्माण करीत होत्या, तशाच मुसलमानांच्यामध्ये हिंदूंनी केलेल्या कत्तलींच्या कहाण्या प्रचलित होत्या. मुस्लिम निर्वासितांचे लोंढे हैदराबादेत येत होते. हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांनी आपल्या कत्तली केल्या तर कसे? या साऱ्या प्रश्नांनी मनातून मुसलमानही हादरलेला, भेदरलेला असे. पण भीती झाकण्यासाठी तो शौर्याचा अभिनय करी. मुसलमानही एकटा दुकटा रात्री हिंडत नसे. ह्या वातावरणात जुलै-ऑगस्ट संपला.

 सप्टेंबर उजाडला आणि अमीन साहेबांनी शांतपणे पाटलांच्या चौकीवरील रेडिओ आपल्या घरी नेऊन ठेवला. अमीनने योजना चाणाक्षपणे केलेली होती. पण गावकऱ्यांना ह्याचे फारसे महत्त्व नव्हते. नाहीतरी रेडिओ हैदराबाद ऐकण्याची लोकांना इच्छा नव्हती. भारतीय नेत्यांना ही नभोवाणी शिव्या देई. त्या ऐकवत नव्हत्या, आवडत नव्हत्या. ह्या बातम्यांच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. परिणामी तेरा सप्टेंबरला पोलिस अॅक्शन सुरू झाले याची माहिती कुणालाच नव्हती. सकाळी पूर्णेहून निघणारी गाडी नेहमीप्रमाणे निघाली ती अंबा स्टेशनवर सकाळी ७.३० ला आली. हे स्टेशन कुरुंद्याहून पाच मैल दूर होते. ही गाडी पुढे निघून गेली आणि नंतर गाड्या सोडू नका अशी आज्ञा पूर्णेला येऊन पोचली ही गाडी सकाळी अकराला हिंगोलीला पोचली. व तिथेच थांबली. दुपारी भारतीय फौजा हिंगोलीला आल्या. त्यांनी ही रेल्वे अडकवून ठेवली. युद्ध सुरू झाल्याची बातमी फक्त अमीनाला होती. त्याचा विश्वास रेडिओ हैदराबादवर होता. हैदराबाद नभोवाणीने युद्धाच्या बातम्या देताना दुपारी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७९