या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार
व्हावें लागतें; आणि असें न होईल तर, ज्याप्रमाणे शरीरांतील चैतन्याचा लय होऊन त्याबरोबर सर्व अवयवांचा नाश होईल, त्याप्रमाणे समाजाचे अवयवहि एकमेकास साहाय्य न करतील तर समाजाची वाताहात होऊन प्रत्येकास आपापल्या चरितार्थासाठीं खुद्द स्वतःवर अवलंबून रहावें लागेल. व्यक्तीच्या शरीरांतील अवयवांत आणि समाजाच्या शरीरांतील अवयवांत एक मोठा भेद आहे तो हा कीं, ज्याप्रमाणे समाजाच्या प्रत्येक अवयवास ज्ञान, संवेदन, इच्छा इत्यादि मनोधर्म पृथक्त्वाने असल्यामुळे सुखदुःखाचा अनुभव प्रत्येकास होत असून, तें संपादण्याविषयीं किंवा टाळण्याविषयी प्रत्ये- काचा प्रयत्न निरंतर चालू असतो, त्याप्रमाणे व्यक्तीच्या शरीरांतील प्रत्येक अवयवाची स्थिति नाहीं. त्यापैकी प्रत्येकास मन नाहीं. त्या सर्वांचे व्यापार नीट चालणे ही गोष्ट ज्या एका व्यक्तीचे ते अवयव आहेत त्या व्यक्तीस कल्याणकारक आहे. समाज हा काल्पनिक पुरुष आहे. समाजाचें कल्याण म्हणजे या काल्पनिक पुरुषाचें कल्याण नव्हे, तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय. व्यक्तीची तशी गोष्ट नाहीं. व्यक्तीच्या अवयवांस स्वतंत्र मन नसल्या- मुळे व्यक्तीचें जें कल्याण तेच त्यांचे कल्याण होय. व्यक्तिशरीर आणि समाजशरीर यांतील या महत्त्वाच्या भेदामुळे त्याविषयीं विचार करतांना व लिहितांना ही गोष्ट नेहमी डोळ्यांपुढे ठेवावी लागते की, व्यक्तीच्या अव- यवांच्या हितासाठी जे नियम घालावयाचे ते वास्तविक पहातां ते ज्या व्यक्तीचे अवयव असतील त्या व्यक्तीच्या हितासाठी असतात; व समाजाच्या हिता- साठीं जे नियम करावयाचे ते वास्तविक पहातां समाजाच्या अवयवांच्या हितासाठी असतात. तेव्हां व्यक्तींच्या हिताकडे दुर्लक्ष झालें तरी हरकत नाहीं; समाजाचे हित साधलें म्हणजे झालें, असें बोलणें म्हणजे असंबद्ध प्रलाप करण्यासारखें होय; कारण व्यक्तींच्या हिताहून निराळें असें समाजाचें हित नाहीं. तथापि अशा अर्थाचीं वाक्यें नेहमी उच्चारण्यांत येतात व तीं चांगल्या चांगल्या लोकांच्या तोंडून येतात; तेव्हां वरील अर्थाहून त्याचा कांहीं तरी भिन्न अर्थ असला पाहिजे. सूक्ष्म विचारांती असे दिसून येईल कीं, जेव्हां अशा प्रकारचे लोक समाजाच्या हिताविषय कळकळ व व्यक्तीं- च्या हिताविषयीं उदासीनता दाखवितात, तेव्हां त्यांचा खरा भावार्थ असा असतो की, समाज म्हणजे त्यांतील बहुतेक किंवा निदान प्रमुख लोक. व्यक्तींच्या