या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८९]

सारांश, सरावानें मनुष्याला काम चांगलें करतां येऊन तें लवकरही करतां येतें. ह्मणजे संपत्तीच्या गुणांत व प्रमाणात अशी दुहेरी वाढ होते.
 दुसरा फायदा-एका कृत्यापासून दुस-या कृत्याला जातांना फुकट जाणारा वेळ वांचतो. जेव्हां एक कामदार एखाद्या वस्तूच्या उत्पादनांतील सर्व क्रिया एकटाच करतो त्या वेळीं इकडून तिकडे जाण्यांत हीं हत्यारें टाकून दुसरीं घेण्यांत कितीतरी वेळ जातो. शिवाय येथें मानसिक शास्त्रांतलें एक तत्व लागू पडते. एका कामापासून दुस-या कामांत मन गुंतविण्यास थोडा काळ जातो. यामुळे या नव्या कामांत प्रथमतः मन लागत नाहीं व मन लागल्याखेरीज काम चांगलें व जलद वठत नाहीं हें उघड आहे. परंतु मनुष्य एकच काम करीत असला ह्मणजे त्याचें एकाग्र चित्त लागतें व काम जलद उठतें.
 श्रमविभागाचा तिसरा फायदा ह्मणजे त्याच्या योगानें श्रम वांचविणा-या यंत्राचा शोध लागतो. मनुष्य एक काम एकसारखे करीत असला म्हणजे कामांतील सर्व खुब्या त्याच्या ध्यानांत येतात व यामुळे हत्याराच्या व यंत्राच्यामधील दोष लक्षांत येऊन नवीन शोध लागण्याचा संभव असतो व असलेल्या यंत्राची सुधारणा होते. अर्वाचीन काळीं मोठमोठे शोध आधिभौतिकशास्त्रज्ञांनीं किंवा शाखांचीं तत्वें माहीत असणारांनीं केले आहेत हें खरें. तरी पण त्या शोधांमध्यें कामक-यांनीं वारंवार सुधारणा घडवून आणून त्या शोधांची उपयुक्तता वाढविली आहे यांत शंका नाहीं. अँँडाम स्मिथनें श्रमविभागाचे हे तीन प्रमुख फायदे सांगितले आहेत. दुसन्या फायद्याबद्दल मिल्लवगैरेंनीं प्रतिकूल टीका केली आहे. त्यांचें ह्मणणें एकसारखें एकच काम केलें म्हणजे तिकडे मन उत्तम लागतें हें सर्वस्वी खरें नाहीं. कामाच्या अशा एकतानतेने मन उलट त्या गोष्टीकडे लागत नाहीं व क्षणोक्षणीं नवें नवें काम करणारा मनुष्य केव्हां केव्हां चलाख व ताज्या मनाचा राहू शकतो. हें खाणावळींतील किंवा दुकानांतील नोकरांच्या उदाहरणांवरून दिसून येईल. परंतु अॅडाम स्मिथचें म्हणणें सामान्यतः खरें आहे; व श्रमविभागानें वेळाचा पुष्कळ फायदा होऊन काम जलद होऊं लागतें हैं कांहीं खोटें नाहीं आतां मानसिक विकासाच्या दृष्टीनें एका मनुष्यानें सतत एकच काम करीत राहणें चांगलें किंवा बाईट हा वादग्रस्त प्रश्न असेल, परंतु त्याचा येथें विचार करण्याची जरूरी नाहीं.