या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९०]

 पुढील ग्रंथकर्त्यांनीं श्रमविभागाचे आणखीही दोन तीन फायदे दाखविले आहेत.
 श्रमवभागाच्या योगानें काम शिकविण्याचा वेळ पुष्कळ कमी होता. एखादा सर्व धंदा शिकावयाचा असल्यास किंवा पुष्कळ धंदे शिकावयाचे असल्यास किती तरी वर्षे शिक्षणांत व उमेदवारीत घालवावीं लागतात. परंतु जेथें एखाद्या धंद्यांतील एखादी कृतीच शिकावयाची असत तेथें फारदिवस शिक्षण व फार दिवसांची उमेदवारी लागत नाहीं.
 श्रमविभागाचे योगानें कामदारांचें वर्गीकरण करता येऊन प्रत्येकाला आपआपल्या शक्तीप्रमाणें, कौशल्याप्रमाणें व इतर गुणांप्रमाणें काम करतां येऊन त्या त्या प्रमाणें कमीअधिक मोबदला मिळवितां येतो. जेव्हां एकाच मनुष्याला एखादा सबंध माल तयार करावा लागतो त्या वेळीं त्यांतल्या कांहीं कृति सोप्या व कांहीं कमी श्रमाच्या असल्यामुळं व कांहीं जास्त कुशलतेच्या असल्यामुळे असा माल तयार करण्यास सर्वांत कुशल कामदार नेमावा लागतो; व याच कामगाराला कमी कुशलतेच्या कृति कराव्या लागतात व त्याची मजुरी मात्र जास्त कुशलतेच्या कामाप्रमाणें द्यावी लागते. यामुळे सर्व मालाला खर्च जास्त येतो. परंतु श्रमविभागाचें तत्व अमलांत आल्यानें कुशल कामगाराला त्याच्या गुणाप्रमाणें मजुरी मिळून शिवाय माल स्वस्तच पडतो. श्रमविभागाच्या तत्वामुळे अर्वाचीन काळीं बायकांच्या व मुलांच्या कामाला विशेष मागणी उत्पन्न झालेली आहे. जि कामें फार मेहनतीचीं नाहीत अशा कामाला पुरुष कामगार लावण्याची गरज नाही. श्रमविभागाच्या तत्वानें थोडेंसें शारीरिक व्यंग असलेला माणूसही काम करूं शकतो व त्याच्या श्रमाला किंमत येते वजास्त कौशल्याच्या माणसाला आपला सर्व वेळ जास्त कौशल्याच्या कामांत खर्च करता येऊन मजुरी जास्त मिळविता येते .
 शेवटचा फायदा म्हणजे श्रमविभागाच्या योगानें धंद्यामध्ये यंत्राचे साहाय्य हवें तितकें घेतां येतें खरोखरी यंत्राची वाढ व श्रमविभाग या परस्परावलंबी गोष्टी आहेत. एखादा नवा शोध लागला म्हणजे तितके कम यंत्रांनीं होऊं लागतें व तें यंत्र चालविण्यास एक मनुष्य लागू लागतो व श्रमविभाग जास्त करतां येतो व श्रमविभाग जास्त झाला ह्मणजे यंत्राची वाढ अगर सुधारणा होते.