या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११५]

आहेत म्हणून वर सांगितलें आहे त्यांपैकीं एका गोष्टीबद्दल कांहीं उत्क्रान्तिवाद्यांनीं आक्षेप घेतला आहे. विवाहवासना ही त्याच्या उन्नतीबरोबर कमी होते व त्याची प्रजोत्पादनशक्तिही कमी होते असे त्याचें म्हणणें आहे. हर्बर्ट स्पेन्सरनें असें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे कीं, जसजसा समाज उत्क्रान्तीच्या व भरभराटीच्या वरच्या पायरीवर जाऊं लागतो तसतशी प्रजोत्पादनशक्तिही कमी होते. सुाशिक्षित माणसांची व बौद्धिकधंदे करणाराची प्रजोत्पादनशक्ती कमी होत जाते असें दिसून येतें. परंतु ही गोष्ट स्वाभाविकपणें होते किंवा बह्मचर्याच्या प्रवृत्तीनें होते याचा निर्णय झालेला नाहीं व या विषयासंबंधीं उत्क्रान्तिवाद्यांमध्यें कोणतेंही ठाम मत झालेलें नाहीं. तेव्हां सामान्यतः मॅलथसचें म्हणणें सर्वसाधारण समाजाला अजूनही लागू आहे यांत शंका नाही.
 लग्नाची वासना व प्रजोत्पादनाची शक्के यांचा समाजाच्या सांपत्तिक स्थितीशीं व मनुष्याची भरभराट किंवा विपत्ति यांच्यांशीं संबंध आहे, हें आमच्या हिंदूसमाजाला अश्रुतपूर्वच आहे. आमच्यांतील या संबंधाच्या चाली व कल्पना यांचा धर्माशीं निकट संबंध असल्यामुळे या चाली व कल्पना परिस्थिति कितीही बदलली तरी ' बदलल्या नाहींत. हिंदूसमाजांत अशी एक कल्पना प्रचलित आहे कीं, प्रत्येक मुलीचें लग्न झालेंच पाहिजे. तसेच प्रत्येक पुरुषानें गृहस्थाश्रम स्वीकारला पाहिजे. या धार्मिक कल्पनेमुळे मुलांमुलींचीं लग्ने करून देणें हें आईबापांचें आद्यकर्तव्य आहे असें समजलें जातें, यामुळे आमचीं लग्ने म्हणजे अर्थशास्त्रकार ज्याला बालविवाह म्हणतात त्या काळाच्याही आधींच होतात. स्त्रीपुरुष उपवर झाल्याबरोबर विवाह होणें म्हणजे मुलीचा चवदापंधराव्या वर्षी व मुलाचा सतराअठराव्या वर्षी होणारा विवाह याला ते बालविवाह म्हणतात. आमचे इकडील विवाह यापूर्वीच घडून आलेले असतात. यामुळे लोकसंख्येचा ब्रह्मचर्य अगर आत्मसंयमन म्हणून जो निग्रह मॅलथसनें सांगितला आहे.त्याला येथे अवकाश राहत नाही. आमच्या सर्व जातींमध्यें मुलांमुलींचा विवाह करून देणं हें आईबापांचें पहिलें कर्तव्यकर्म समजलें जांतें. आपल्या मुलाबाळांचें शिक्षण कसें होईल व ते आपल्या पायांवर उभे राहण्यास कसे तयार होतील याची