या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२६]

तेव्हां सध्यां येथें इतकेंच विवेचने बस्स आहे,परंतु आमचा शेतकरीवर्ग सररहा उधळा आहे हें मात्र खरें नाहीं. काटकसर हा गुण आमच्या सर्व जातींतील लोकांच्या हाडींमांशीं खिळलेला आहे. परंतु देशाच्या भांडवलाच्या वाढीला या प्रवृत्तीचा व्हावा तितका उपयोग होत नाहीं याचें कारण दुस-या व तिस-या अनुकूल गोष्टींचा अभाव होय.
 हिंदुस्थानांत बहुजनसमाजाचें उत्पन्नच इतकें कमी आहे कीं, मनुप्याच्या अवश्यकांला तें धडपणें पुरत नाहीं व अशा स्थितींत काटकसर झाल्यानें संपत्तिच्या उत्पत्तिच्या एका कारणाला कमतरता येत जाते. तोच प्रकार येथें चालू आहे. देशांतील मजूरवर्ग कमी शक्तिमान् व कमी कर्तृत्ववान् होत जात आहे व यामुळे संपत्तीचा मूळ झराच खराब होत चालला आहे.
 तिस-या अनुकूल गोष्टीसंबंधानें मात्र हिंदुस्थानांत ब्रिटिश अमलांत पुष्कळच सुधारणा घडून येत चालली आहे. व या संस्थांचा जसजसा प्रसार होईल तसतसा भांडवलाचा पुरवठा वाढत जाईल. कारण या तिस-या अनुकूल गोष्टींमुळेच देशांत तरतें चल भांडवल वाढतें व अशा भांडवलाचा संपत्तीच्या उत्पत्तीस फार उपयोग असतो.
 पूर्वकाळीं देशामध्यें शांतता नव्हती; जिकडे तिकडे दंगेधोपे असत; यामुळें मालमत्तेला सुरक्षितता नव्हती. ह्मणून लोकांची प्रवृत्ति आपली शिल्लक डागडगिन्यांच्या रूपानें व पैशाच्या रूपानें पुरून ठेवण्याची फार होती. अशा रुपांत ठेवलेल्या संपत्तीचा देशाला, व्यापाराला किंवा संपन्युत्पादनाला मुळींच उपयोग होत नाहीं. यामुळेंच हिंदुस्थानांत सोनें, रुपें गडप होत असे व युरोपियन लोकांना हा देश फार सधन आहे असें वाटत असे. आमच्या पुराणप्रियतेमुळे ही प्रवृत्ति अजून पुष्कळ अंशांनीं आहे तशीच आहे. खानदेशासारख्या भिल्लादि लुटारू लोकांनीं भरलेल्या प्रांतांत अजूनही लाखों रुपये पुरलेले आहेत असें ह्मणतात व असें पुरलेलें व ह्यणून व्यापारवृद्धीस निरुपयोगी झालेलें फार मोठें भांडवल हिंदुस्थानांत आहे असा पुष्कळ माहीतगार युरोपियनांनीं अंदाज केलेला आहे व या ह्मणण्यांत बरेंच तथ्य आहे यांत शंका नाही. तेव्हां हल्लीच्या सुधारलेल्या व सुरक्षिततेच्या काळांत आमच्या लोकांनीं डागडागिन्यांत पैसे वाजवीपेक्षां फाजील घालण्याची प्रवृत्ति तसेच पैसे पुरून ठेवण्याची