या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१३५]

परंतु यथ वांटणीचा प्रश्न उद्भवतो हें निर्विवाद आहे. तेव्हां देशांत पिकणा-या संपत्तीची वांटणी समाजांतील निरनिराळ्या वर्गामध्यें कशी व कोणत्या नियमांनीं होते याचा या पुस्तकांत निर्णय करावयाचा आहे. परंतु या वांटणीच्या प्रश्नाशीं खासगी मालकी अगर स्वत्त्व या कल्पनेचा अत्यंत निकट संबंध आहे हें सहज ध्यानांत येईल. कारण प्रत्येक मनुष्य आपापल्या गरजा आपल्या एकट्याच्या श्रमानें पुरवीत असतांना ज्याप्रमाणें वांटणीचा प्रश्न निघत नाहीं. त्याप्रमाणें जेथें खासगी स्वामित्वाची कल्पना नाहीं, तेथेंही वांटणी अगर वांटणीचे नियम हा प्रश्न उद्भवत नाहीं. एखाद्या कुटुंबामध्यें पुष्कळजण मिळवते असले तरी ते आपली सर्व मिळकत एकत्र करतात व सर्व कुटुंबाच्या माणसांच्या गरजा भागविण्याकरितां त्याचा व्यय करतात. अशा संयुक्त कुटुंबांत अमक्याची वांटणी अमुक असा प्रश्न कोणी काढीत नाहींत. कारण कुटुंबामध्यें प्रत्येक व्यक्तीला खासगी स्वामित्व नसतें. सर्व मिळकत संयुक्तकुटुंबाची समजली जाते. परंतु तेच निरानराळे गृहस्थ जेव्हां एकत्र भांडवलावर एखादा धंदा करतात तेव्हां नफ्यामध्यें वांटणीचा प्रश्न येतो व प्रत्येकाच्या भांडवलाच्या हिस्सेरशीनें प्रत्येकास नफ्याचा वांटा मिळतो. यावरून जेथ श्रमविभागाचें तत्त्व अंमलांत आलेलें नसेल किंवा जेथें समाईक स्वामित्वाचीच कल्पना रूढ असेल अशा ठिकाणीं वांटणाचा प्रश्न निघत नाही खरा. तरी पण प्रत्येक समाजांत थोड्याबहुत प्रमाणावर श्रमविभागाचें तत्व अंमलांत असतेंच व खासगी स्वामित्वाची कल्पनाही थोड्या फार प्रमाणानें अस्तित्वांत आलेली असते, यामुळेंच प्रत्येक समाजांत संपत्तीच्या वांटणीचा प्रश्न उद्भवतो. तेव्हां समाजांतील निरानराळ्या वर्गांमध्यें संपत्तीची वांटणी कशी होते व त्या वांटणीचे सामान्य नियम काय, हें आपल्यास या पुस्तकांत ठरवावयाचें आहे.
 परंतु संपत्तीच्या उत्पत्तीचे नियम व संपत्तीच्या वांटणीचे नियम यांमध्ये फार मोठा भेद आहे असें मिल्लनें आपल्या ग्रंथाच्या या भागांत प्रतिपादन केलें आहे. या फरकाचें त्याला किती महत्व वाटत असे याची साक्ष त्याच्या आत्मचरित्रावरून येते. या चरित्रांत या नियमांमधील फरकाचा बोध हा एक आपला मोठा सामाजिक शोध होता असें त्यानें हृाटलें आहे. तेव्हां प्रथमतः या मताचा विचार करणें जरूर आहे.