या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४०]

प्रमाणें स्वकष्टार्जित वस्तूंवर आपला स्वामित्वाचा हक्क चालतो. त्याप्रमाणें ज्या वस्तु आपण आपल्या स्वतःच्या श्रमानें उत्पन्न केल्या नाहीत परंतु, ज्या आपल्याला दुस-यांशीं करार करून मिळालेल्या आहेत त्यांवरही आपला सारखाच हक्क आहे. ह्मणजे करार करणें हाही एक श्रमाचाच प्रकार आहे; व प्रत्येक सरकारानें कराराच्या शर्ती व्यक्तीस पाळावयास लावल्या पाहिजेत. ज्याप्रमाणें जीवित व मालमत्ता यांचें संरक्षण करणें हें सरकारचें काम आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीकडून करारपालन करुन घेणें हेंही एक सरकारचें काम आहे. ही कल्पनाही हळूहळू वाढत आलेली आहे. कोणत्या प्रकारचे करार कायदेशीर समजले जातात व कोणते अनीतिवर्धक किंवा समाजविघातक म्हणून बेकायदेशीर गणले जातात, वगैरे गोष्टींचा सविस्तर विचार कायदेशास्त्रांत केला जातो. त्याचा येथें विस्तार करण्याचें प्रयोजन नाहीं.
 स्वामित्वाच्या कल्पनेंतील तिसरें तत्व ह्मणजे प्रत्येक मनुष्याला आपल्या शिलकेचा फायदा घेण्याचा हक्क आहे. आपण मिळविलेली संपत्ति शिल्लक टाकणें हें एक श्रमाचें फळच आहे. व या फळाचा पूर्ण फायदा घेणें हा एक मनुष्याचा हक्क आहे. हें तत्त्व ह्मणजे पहिल्या तत्त्वाचाच एक भाग होय, तेव्हां त्याचें विशेष विवेचन करण्याची जरूरी नाहीं.
 स्वामित्वाच्या कल्पनेंतील चवथें तत्त्व म्हणजे ज्या वस्तूवर आपला अव्याहत ताबा आहे तिचें स्वामित्व आपल्यकडे येतें, हें तत्त्व खरोखरी अर्थशास्त्रीय नाही.तर तें एक कायद्याचें तत्त्व आहे व म्हणून त्याचा येथें ऊहापोह करण्याची जरुरू नाहीं.
 अर्थशास्त्रदृष्ट्या श्रम,करार व शिल्लक हीं तीन स्वामित्वाचीं अंगें होत व खासगी स्वामित्व किंवा खासगी मालकी या संस्थेचें महत्त्व या तीन अंगांवरच अवलंबून आहे. स्वामित्वाचीं ही अंगें जर नाहींशी झालीं तर मनुष्याच्या हातून संपत्ति उत्पन्न होण्याचेंच बंद पडेल.कारण मानवीश्रमाचा एक मोठा आधारस्तंभ नाहींसा होईल. परंतु आपल्या पश्चात मिळकतीची विल्हेवाट करण्याचा हक्कही स्वामित्वाच्या कल्पनेत येतो यांत शंका नाहीं. पूर्वकाळीं हा हक्क व्यक्तीस नव्हता. कारण त्या काळीं मिळकत ही कुटुंबाची समजली जात असे व एक मनुष्य मेला म्हणजे ती मिळकत कुटुंबांतील दुसऱ्या कर्त्या पुरुषाच्या ताब्यांत येई.