या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४४]

होय व ज्याप्रमाणें सर्व व्यवहारांत विक्री व खरेदी व त्याच्या किंमती ही गोष्ट अत्यंत व्यापक आहे त्याचप्रमाणें भाड्याची गोष्टही फार व्यापक आहे.परंतु अर्थशास्त्रांत भाडें हा शब्द इतक्या व्यापक अर्थाने वापरीत नाहीं तर तो फार संकुचित अर्थानें वापरतात. जमीनुदारास जमिनीच्या स्वाभाविक व अनश्वर सुपीकतेबद्दल जो पैशाच्या रूपानें मोबदला मिळतो तें भाडें, इतक्याच अर्थानें हा शब्द येथें वापरला आहे. यालाच खंड किंवा मक्ता म्हणतात, असा संकुचित अर्थ घेतला म्हणजे एका संलग्न अशा विषयाचा अन्तर्भाव या शब्दांत होतो. प्रत्येक देशामध्यें जमीनदारांचा एक वर्ग असतो व सुधारलेल्या देशांत जमीनदार अगर जमिनीचे मालक हे जमीन कसणारे शेतकरी नसतात. ह्मणजे श्रमविभागाचें तत्व अंमलांत येऊन जमिनीचे मालक व शेतकीचा धंदा करणारे असे दोन निरनिराळे वर्ग होतात, व धंदेकरी शेतकरी आपल्या सोईच्या जमिनी मालकापासून भाडयानें अगर खंडानें घेतात व त्यांची लागवड करतात. तेव्हां जमीनदार असा एक स्वतंत्र वर्ग सुधारलेल्या समाजांत अस्तित्वांत येतो व या वर्गाचें उत्पन्न म्हणजे त्याला मिळणारें भाडें अगर खंड होय. तेव्हां भाडें हा राष्ट्रीय संपत्तीचा एक निराळा हिस्सा अगर वांटा पडतो व जमिनीचे मालक व जमीन कसणारे हे जरी एकच असले तरी सुद्धां त्यांना जमिनीपासून जें उत्पन्न मिळते त्याचे स्वाभाविक दोन हिस्से पडतात. एक ते जमिनीचे मालक ह्मणून मिळणारा हिस्सा, व एक जमीन कसणारे म्हणून मिळणारा हिस्सा. हा दुसरा हिस्सा ह्मणजे त्यांच्या श्रमाची मजुरीच होय. तेव्हां प्रत्येक देशांत भाडें ह्मणून संपत्तीचा एक हिस्सा झालाच पाहिजे. आतां या भागांत या भाड्याचें स्वरूप कोणत्या प्रमाणानें ठरलें जातें व तें निर्माण होण्याचीं कारणें काय व या भाड्यांच्या नियमांवरून कोणते उपसिद्धांत निष्पन्न होतात वगैरे विषयांचें विवेचन करावयाचें आहे.
 हा विषय अर्थशास्त्रांतील एक अत्यंत वादग्रस्त विषय आहे. 'भाड्याची उपपत्ति' ही प्रथमतः रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञानें शोधून काढिली हे या ग्रंथाच्या प्रास्ताविक पुस्तकांत सांगितलेंच आहे व त्या काळीं इंग्लंडची सांपत्तिक स्थिति कशी होती; व कोणत्या परिस्थितींत ही उपपत्ति उदयास आली हेंही त्या ठिकाणीं दाखविलें आहे. तेव्हां येथें