या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१५०]

हास शिकवितो हें कॅरेनें सप्रमाण सिद्ध केलें आहे असें कबूल केलें पाहिजे. कॅरेचा दुसरा आक्षेप म्हणजे रिकार्डोच्या सर्व उपपत्तीचें मूळच नाहींसें करण्यासारखा आहे. रिकार्डोच्या उपपत्तीचें रहस्य ह्मणजे हें कीं, जमिनीचा खंड हा जमिनीच्या स्वाभाविक व अविनाशी अशा शक्तींचा मोबदला होय. भांडवल किंवा श्रम यानें जी जमिनीची शक्ती वाढली असेल व त्याबद्दल जी खंडाचा भाग जमीनदारांस मिळतो तो व्याज व नफा या जातीचाच आहे. परंतु जमिनीच्या ज्या मूळच्या शक्ती आहेत, त्याबद्दलचा मोबदला म्हणजेच अर्थशास्त्रांतील खंड होय व असा खंड देशाच्या सांपत्तिक प्रगतीबरोबर आपोआप वाढत जातो, व नफा व व्याज हीं तर देशाच्या भरभराटीबरोबर कमी कमी होत जातात म्हणजे खंडाचें स्वरूप व व्याज आणि नफा यांचें स्वरूप अगदीं एकमेकांविरुद्ध आहे असें ह्मणण्याचा रिकार्डोच्या प्रतिपादनाचा अर्थ आहे.कॅरेने अगदीं याच्या उलट प्रतिपादन केलेलें आहे. त्याचें म्हणणें हें कीं, जमिनीची सुपीकता ही मुळीं भांडवल व श्रम यांचाच सर्वस्वी परिणाम होय. न लागवड केलेली जमीन जरी मूळची सुपीक असली तरी ती रानानें व झाडाझुडुपांनीं अगदीं भरून गेलेली असते व अशा जमीन लागवडीस आणण्यास जितकें भांडवल व जितके श्रम लागतात त्याचें व्याज जर आकारलें तर असें दिसून येईल कीं, जमिनीचा सर्व खंड हा मूळचें भांडवल व श्रम व लागवडीस लागणारें भांडवल व श्रम या दोहोंच्या व्याजापेक्षां जास्त न येतां कमीच येतो. परंतु कॅरेच्या या आक्षेपांत फारसा तथ्यांश नाहीं असें विचारांतीं दिसून येईल. कारण कॅरेंनें केलेली मोजदाद ही अगदीं भ्रामक आहे. जमिनीची सुपीकता मूळची कशीही उत्पन्न झालेली असो; परंतु सुपीक जमीन व कमी मगदुराची जमीन यांच्या खंडांत पुष्कळ अंतर पडतें व हा खंड या वाढीबराबर नफ्याप्रमाणें किंवा व्याजाप्रमाणें कमी न होतां वाढत जातो; हा अनुभव सार्वत्रिक आहे व तितक्यापुरती रिकार्डोची उपपत्ति सत्यास धरून आहे यांत शंका नाहीं.
 रिकार्डोच्या उपपत्तीविरुद्ध आणखी दुसरेही पुष्कळ आक्षेप आहेत, त्याचाही येथें थोडक्यांत विचार करणें अवश्यक आहे. रिकार्डोच्या उपपत्तीमध्यें बिनखंडी जमीन देशांत असलीच पाहिजे असा एक मुद्दा आहे.