या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१५२]

नाहीं हें खरें आहे, कारण वर प्रतिपादन केल्याप्रमाणें भाडें हें स्वामित्वाबद्दलच मिळतें. तेव्हां एका मनुष्याची जमीन दुसऱ्यास उपयोगास पाहिजे असल्यास त्याला कांहीं तरी स्वामित्वाबद्दल दिलें पाहिजे, हें उघड आहे. रिकार्डोनें देशांतील सर्व जमीन एकाच धान्याला द्यावयाची अशी कल्पना केली आहे व अशा कल्पनेप्रमाणें कांहीं जमीन इतकी निकस असेल कीं, तीमध्यें गहूं पेरून गहूं उत्पन्न काढण्याला इतका खर्च लागेल कीं, शेतकऱ्याला अशी जमीन भाइयानें घेणें परवडणारच नाही. परंतु जरी ती जमीन गव्हाला निरुपयोगी असली व गव्हाच्या पिकाकरितां ती कोणी खंडानें घेतली नाहीं तरी ती गवताकरितां पुष्कळ सुपीक असेल व गवत वाढवण्याकरितां व तें विकण्याकरितां जमिनीच्या मालकापासून एखादा शेतकरी ती जमीन खंडानें घेईल. मात्र या जमिनीचा खंड गव्हाच्या जमिनीइतका येणार नाहीं. तेव्हां देशांतील जमीन उंची मगदुरापासून अगदीं खालच्या मगदुरापर्यंत असली तरी निरनिराळ्या प्रकारांच्या पिकांकरितां तिचा उपयोग होतो व अगदीं प्रत्यक्ष खडक किंवा दलदल अशा जमिनीखेरीज देशांतील सर्व जमिनीवर थोडाबहुत खंड येतो यामध्यें शंका नाही. व म्हणून रिकार्डोच्या उपपत्तीविरुद्ध हा एक आक्षेप सत्यरूप आहे, असें कबूल करणें भाग आहे.
 येथपर्यंत रिकार्डोच्या उपपत्तीवरील आक्षपांचा विचार झाला परंतु त्या उपपत्तीवरून काढलेले सिद्धांतही त्रिकालाबाधित नाहींत, हें आतां दाखवावयाचें आहे. उदाहरणार्थ, रिकार्डोच्या उपपत्तीचा एक मोठा सिद्धांत म्हणजे जमिनीचा खंड हा नेहमी वाढतच जातो हा आहे. परंतु हेंही सर्वस्वी खरें नाहीं. ही वाढ कांहीं प्रसंगीं न होण्याचीं कारणें दोन आहेत. एक नवीन सुपीक जमिनीचा शोध लागून त्या लागवडीचें स्वस्त धान्य देशांत येऊं लागलें म्हणजे त्या देशातील लागवडीची धार वर जाते व म्हणून जमिनीचे खंड कमी होतात. अमेरिकेमध्यें शेतकीची वाढ झाल्यानंतर इंग्लंडमध्यें तेथून धान्य येऊं लागल्यापासून इंग्लडांतील भाडी कमी होत गेलेलीं आहेत, दुसरें कारण लागवडीच्या कलेंत सुधारणा. याचे योगानेंसुद्धां धान्य स्वत होते व तें स्वस्त झालें म्हणजे लागवडीची धार वर जाऊन जमिनीचे खंड कमी होतात. यावरून देशांतील खंड सतत वाढत गेलेच पाहिजेत असें नाहीं.