या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग चवथा.
मजुरी व तिचे सिद्धांत.

 देशांतील संपत्तीचा दुसरा मोठा वांटा म्हणजे मजुरी होय. मजुरी हा श्रमाचा मोबदला आहे. संपत्ति उत्पन्न करण्यास जे मानवी श्रम लागतात त्या सर्वाचा अन्तर्भाव येथें होतो, मग ते श्रम शारीरिक असोत, मानसिक असोत; त्या श्रमाला शिक्षणरूपी पूर्वतयारी लागो न लागो; ते श्रम अगदीं सांगकाम्या दिसमजुरापासून तें एंजिनीयर म्यानेजरापर्यंत असोत. जे जे लोक कांहीं ठराविक काम करून त्या मानानें मजुरी घेतात; किंवा दिसमजुरी करतात किंवा महिनेमाल मजुरी मिळवितात त्या त्या सर्वांचा अन्तर्भाव मजूर या वर्गामध्यें होतो हें या ग्रंथाच्या पहिल्या पुस्तकांत स्पष्ट करून दाखविलेंच आहे. आतां या भागांत या मजूरवर्गाच्या वांट्याला येणारी मजुरी हिचा सविस्तर विचार करावयाचा आहे. निरनिराळ्या धंद्यांत निरनिराळे मजुरीचे दर असतात हें उघड आहे. आतां हे निरनिराळे दर कां होतात हा एक या भागांतला महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेंच या सर्व धंद्यांतील मजुरीच्या दराची सरासरी काढली म्हणजे एक मजुरीचा सामान्य दर निघतो. तेव्हां ह्या मजुरीचा सामान्य दर कसा ठरतो हाही एक या भागांतला महत्वाचा प्रश्न आहे. या बाबतींत निरनिराळ्या देशांकडे पाहिलें म्हणजे विलक्षण फरक दिसून येती. इंग्लंड, अमेरिकेसारख्या औद्योगिक बाबतींत शिखरास पोंचलेल्या देशांत मजुरीचा सामान्य दर किती तरी मोठा असतो. तोच हिंदुस्थानांत सामान्य दर अगदींच कमी असतो. तेव्हां हें कां होतें हें प्रथमतः पाहिलें पाहिजे. परतु या विचारास लागण्यापूर्वी मजुरी या पदामधील एक संदिग्धता लक्षांत आणिली पाहिजे.
 देशामध्यें पैसा वापरण्याची प्रवृत्ति झाली म्हणजे मजुरी हि नेहमीं पैशांतच दिली जाते.परंतु पैशाच्या रूपानें दिलेलीं मजुरी हि नांवाची होय.या मजुरीवरून मजुरांच्या सांपत्तिक स्थितीचा खरा अंदाज करतां