या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१५९]

मालाच्या किंमतीवर व गिऱ्हाईकांच्या संख्येवर अवलंबून असते. कारखान- दारांना गिऱ्हाईक कमी होणार असे दिसलें कीं, ते आपल्या कारखान्यांचे काम कमी करतात व लागलीच कांही मजूर कमी करतात किंवा कारखाने कांही दिवस बंद ठेवू लागतात. तसेच एखाद्या मालाचा खप जास्त होण्याचा रंग दिसला की लागलीच कारखानदार मजूरलोक वाढवितात किंवा त्यांना मजुरी जास्त देऊन त्यांजकडून काम जास्त करून घेतात.तेव्हां मजुरांना यावयाचें चल भांडवल ही कांहीं एक ठरीव वस्तु नाहीं, तर व्यापाराच्या तेजीमंदीप्रमाणे ती कमीजास्त होणारी आहे.म्हणूनच मालाचे भाव वाढते असले म्हणजे मजुरीचे दरही वाढते असतात. परंतु मिलला हें म्हणणे कबूल नव्हते, कारण त्याच्या उपपत्तीप्रमाणे मजुरीचे दर वाढण्यास आधीं भांडवल वाढलें पाहिजे. परंतु मालाचे भाव चांगले असले,कारखानदारांना नफा चांगला होऊ लागला म्हणजे त्याचा परिणाम भांडवल वाढण्यात होते हे मिलला कबूल आहे. तेव्हां या कल्पनेच्या पुरस्कर्त्याप्रमाणे सुद्धां मालाच्या खपावर मजूरी अवलंबून आहे असे सिद्ध होते. परंतु मजूरी ही मालाच्या खपावर प्रत्यक्षपणे अवलंबून नाही; तर ती खपावर अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे एवढेच या मजुरीफंडाच्या कैवाऱ्याचे म्हणणे आहे.
 या उपपत्तींतील दुसरें विधान म्हणजे देशांतील मजुरांचा वर्ग हाही अगदी ठराविक असतो व मजुरी कांहींही असो त्या सर्वांना मजुरी केलीच पाहिजे. हेंही विधान सर्वथा खरें नाहीं. कांहीं लोक केव्हां केव्हां मजुरी करतात,केव्हां केव्हां करीत नाहीत.शिवाय भांडवल व मजूर हे देशाबाहेर जाऊं शकतात. परंतु पहिल्या विधानापेक्षा दुसरें विंधान पुष्कळ अंशाने खरे आहे असे कबूल केलें पाहिजे. तिसरें, मजुरी ही सदोदित पूर्ण चढाओढीने ठरली जाते हे विधानही सर्वस्वी खरें नाहीं. सुधारलेल्या देशांत दिवसेंदिवस कारखानदारांचे संघ होत आहेत, त्याचप्रमाणें मजुरांचेही संघ बनत आहेत. तेव्हां हल्लीच्या काळी व्यक्तीव्यक्तीमधील चढाओढ कमी झाली आहे व त्याचे ऐवजी दोन वर्गामध्ये चढाओढ सुरू झालेली आहे.
 ज्या तीन विधानांमिळून मजुरीफंडाची कल्पना बनलेली आहे ती तिन्हीही विधाने सर्वाशीं खरीं नाहींत इतकाच या कल्पनेवर आक्षेप आहे