हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५]

स्वरूप व त्याच्यायोगानें होणा-या अदलाबदलीचें स्वरूप, पेढ्या व त्यांचा उपयोग, हुंडीचा व्यापार व त्याची उपयुक्तता वगैरे विषयांचा ऊहापोह केलेला असतो. आतां आमच्या समाजांत या सर्व गोष्टी पूर्णतेस आल्या होत्या व या संबंधाचा स्वतंत्र धंदा करणारे सराफ व पेढीवाले हेही होते. पैशाची देवघेव करणें, नाणीं पारखून घेणें,पेढीचा व्यापार चालविणें, हुंडीचा व्यवहार करणें वगैरे कामें हे लोक करीत, व मोठमोठया शहरीं पेढ्यांची दुकानें असत. व सर्व देशभर पेढ्यांचे जाळें पसरलेलें असे.पुण्यास पैसे भरले असतां काशीस हुंडी दाखवून पैसे मिळत अशाबद्दल जुने दाखले सांपडतात. पेढ्यांच्या व्यवहारासंबंधीं बहुतेक पारिभाषिक शब्द आमच्या भाषेत रूढ झालेले होते, परंतु या भागाची इतकी व्यावहारिक प्रगति झाली असतांना या विषयावर एखादा ग्रंथ झाला नाहीं.कारण,या उपयुक्त व्यवहाराची मीमांसा करण्यास लागणारा बुद्धिविकास वैश्य जातींत झाला नव्हता.
 वरील विवेचनावरून आमच्या वाङ्मयांतील अर्थशास्त्राच्या अभावाचें एक मोठं कारण म्हणजे आमच्यांतील तीव्र जातिभेद होय असें दिसून येईल. या अभावाचें दुसरें एक कारण आहे,तें म्हणजे आमच्या तत्वज्ञानानें आमच्यांत रुढ झालेल्या कांहीं कल्पना व भावना ह्या होत.
  "संसार हा असार आहे, विषयसुखाची इच्छा ही मनुष्यास अधोगतीस नेणारी आहे, संपति ही सर्व दुःखाचें मूळ आहे, मानवी आयुष्य क्षणभंगुर आहे; संसार, मानवी वासना, संपति, विषयसुख या सर्व गोष्टी नश्वर आहेत. या सर्व मायामय आहेत; यामध्यें सत्यत्व व सनातनत्व नाही; यामुळे या सर्व मोक्षविघातक आहेत. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्यानें ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलें पाहिजे." अशा प्रकारच्या निवृतिपर वेदान्ताचा आमच्या ब्राह्मणवर्गावर बराच अंमल होता. यामुळेच इतिहास, राजनीति व अर्थशास्त्र या तिन्ही विषयांकडे आमच्या ब्राम्हणांचे लक्ष गेलें नाहीं. कारण, हे तिन्ही विषय नश्वर गोष्टींबद्दल ऊहापोह करणारे; तेव्हां यांत तथ्य किंवा सनातनत्व तें काय असणार असें त्यांना वाटणें साहजिक होतें
 अर्थशास्त्राच्या उदयास अडथळा करणारी अशीच कारणें प्राचीन ग्रीक लोकांमध्येंही होती. त्यांच्यामध्यें गुलामगिरीचा प्रघात जारीनें चालू होता