या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१६१]

म्हणजे या कल्पनेंत दिलेलें कारण खरें आहे. परंतु मजुरीचें हें एवढेंच मात्र कारण नव्हे. खरोखर मजुरीफंडाची कल्पना व पैदाशीची कल्पना या परस्परविरोधी नाहींत तर परस्परपूरक आहेत. म्हणजे मजुरीचा दर, भांडवल, लोकसंख्या, मजुरांची कर्तबगारी, मालाची पैदास व मालाचा खप या सर्व कारणसमुच्चयावर अवलंबून आहे; व या कारणांपैकी एखादें कारण एकदम कमी झालें तर त्याचा मजुरीच्या दरावर परिणाम झालाच पाहिजे.
 येथपर्यंत मजुरीच्या सरासरीच्या दराचा व त्याचा कारणांचा विचार झाला. आतां प्रत्येक देशांत निरनिराळ्या धंद्यांत निरनिराळे मजुरीचे दुर कां असतात व देशांमध्यें सर्व मजुरांमध्यें सारखी चढाओढ असतांना सुद्धां ते दर एकरूप न होतां कायमचे कमीअधिक कां राहतात याचा विचार करावयाचा राहिला. मजुरीच्या सामान्य दरासंबंधी अॅडाम स्मिथच्या ग्रंथांत फारसा ऊहापोह केलेला दिसत नाही. परंतु अभिमतपंथामध्यें वादभूत झालेल्या' मजुरीफंडाची कल्पना' व ‘पैदाशीची कल्पना' या दोहोंचा उल्लेख अॅडाम स्मिथच्या पुस्तकांत आहे. मात्र मजुरीच्या दरांत फरक कां होतो याच्या कारणांचा अॅडाम स्मिथनें विस्तारतः विचार केलेला आहे व याबाबतींतील त्याची कारणमीमांसा सर्वसंमत झालेली आहे. पुढील अर्थशास्त्रज्ञांनीं ती बहुतेक जशीच्या तशीच उतरून घेतलेली आहे, व आपल्यालाही तोच मार्ग अवलंबणें श्रेयस्कर होईल. या कारणमीमांसेमध्यें मजुरी व नफा या दोन्हीचाही अॅडम स्मिथनें एकत्र समावेश केलेला आहे हें येथें ध्यानांत ठेविल पाहिजे.
 धंद्याच्या मजुरीच्या दरांत किंवा नफ्यामध्यें चढाओढीच्या अमदानींतही कायमचे फरक कां राहतात याचीं खालील कारणें अॅडाम स्मिथने नमूद केलीं आहेत.
 पहिलें--धंद्याचें प्रियत्व अगर अप्रियत्व. जो धंदा स्वाभाविकपणें मनास आनंद देणारा आहे त्या धंद्यांतील श्रमाचा मोबदला इतर धंद्यांपेक्षां कमी असतो. कारण श्रमाचा कांहींसा मोबदला त्या धंद्याच्या मनोरंजकतेनें मिळतो. परंतु जो धंदा कंटाळवाणा, त्रासदायक व मनाला दुःख देणारा असतो त्या धंद्याची मजूरी जास्त असते. उदाहरणार्थ, फांशी देणा-या माणसाला पगार जास्त द्यावा लागतो. तसेंच घाणेरडीं कामें ११