या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८२]

तील पद्धतीचें व आमच्या हिंदुस्थानामधील वेठीच्या पद्धतीचें बरेंच सांम्य आहे. खोतांना किंवा इनामदारांना आपल्या गांवांतून कुळांना वेठीनें आपल्या कामास घेण्याचा हक्का असे व अझून कोठें कोठें तो चालू आहे. उदाहरणार्थ अझूनही काकणांत ही वेठीची पद्धत थोडीबहुत चालू आहे परंतु वेठीचें काम ह्मणजे अगदीं टाकाऊ असा तेथेंही अनुभव आहे. व वेठीची जेथें पद्धत असेल तेथें इतर दिसमजुरीचे गडीही तसेच कामचुकार असतात असा आपल्या इकडेही अनुभव आहे.
 रोमन पादशाही ज्या उत्तरेकडील जर्मन लोकांनीं पादाक्रांत केली त्यांनीं जमिनीच्या बाबतींत एक अगदीं नवी पद्धति युरोपांत सुरू केली; तिला जहागिरीपद्धति ह्मणतात. जरीं ही पद्धति राजकीय व लष्करी होती तरी या पद्धतीचे जमीनधाऱ्याच्या पद्धतीवरही पुष्कळ परिणाम झालेले आहेत ह्मणून त्याचा थोडासा इतिहास येथें देणें अप्रासंगिक होणार नाहीं. असें केल्यानें युरोपांत हल्लीं प्रचारांत असलेल्या जमीनधाऱ्याच्या पद्धतीचें स्पष्टीकरण लवकर होईल. कारण या सर्व पद्धती या जहागिरीपद्धतीपासूनच पर्यायानें निष्पन्न झालेल्या आहेत.
 ग्रीक किंवा रोमन:लोकांमध्यें प्रजासत्ताक राज्यपद्धति विशेष प्रचलित होती व पुढें रोमन बादशाही झाली तरी देशांतील जमीन राजाची ही कल्पना त्या काळीं नव्हती. देशांतील सर्व जमिनी खासगी लोकांच्या मालकीच्या असत व सरकारच्या कांहीं जमिनी असल्या तरी सर्व जमिनीची मालकी सरकारची ही कल्पना नव्हती. परंतु जर्मन लोकांमध्यें एकसत्तात्मक राज्यपद्धति विशेष प्रचलित असे. प्रत्येक टोळीचा एक नायक असे व तोच राजा समजला जात असे. तो टोळींतील पोक्त लोकांच्या सभेच्या सल्लामसलतींने राज्यकारभार करी खरा, तरी पण मुख्य सत्ता त्याच्या हातीं असे; जेव्हां सर्व रोमन पादशाही या लोकांनीं पादाक्रांत केली तेव्हां सर्व प्रांतावर अशी एकसत्तात्मक राज्यपद्धति सुरू झाली व काबीज केलेला प्रांत सर्व राजाच्या मालकीचा ही कल्पना या जर्मन लोकांमध्यें प्रचलित झाली. काबीज केलेली ही सर्व जमीन राजा आपल्या लष्करी अनुयायांना अगर सरदारांना वांटून देई व कांहीं भाग आपल्या स्वतःकरिता राखून ठेवी. ही जी जमीन सरदारांना मिळे,त्याबद्दल त्या सरदाराने राजा हुकूम फरमावील तेव्हां ठरलेल्या शिपायांसकट राजाला