या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१८३]

मदत करण्यास आलें पाहिजे असा करार असे. तसेंच प्रत्येक सरदारास राजनिष्ठ राहीन अशाबद्दल शपथ घ्यावी लागे. राजानें सरदारांना दिलेल्या जमिनीबद्दल राजास लष्करी मदत करणें हा मोबदला समजला जात असे. हे सरदार आपल्या जमिनी विभागून त्या आपल्या मानक-यांना याच लष्करी मदतीच्या अटीवर देत असत व या मानक-यांकडून स्वामिभक्तीची शपथ घेववीत. हे मानकरी आपल्या वांट्याच्या जमिनी कुळांना देत. जहागिरीपद्धतीचें सामान्यतः अशा प्रकारचें स्वरूप होतें. अर्थात् या पद्धतीचा विशेष हा कीं, देशांतील सर्व जमिनीचा मालक ह्मणजे फक्त देशाचा राजा, देशांतील जमीन धारण करणारे हे सर्व त्याचीं कुळे व राजाच्या स्वामित्वाबद्दल त्याला लष्करी पेशाची मदत करणें हा जमिनीबद्दलचा खंड अशी समजूत असे. या कल्पनेमुळें राजापासून तों थेट शेत कसणा-या गरीब शेतक-यापर्यंत:समाजांतील वर्गाची एकाखालीं एक अशी मालिका बने. प्रत्येक खालच्या वर्गाच्या माणसानें प्रत्येक वरच्या वर्गाच्या माणसाच्या आज्ञेंत राहिलें पाहिजे; व युद्धकाळीं त्याला जातीनें मदत केली पाहिजे असा निर्बंध असे. या पद्धतींत राजकीयदृष्ट्या सरदारांच्या हातांत सत्ता राजांपेक्षांही जास्त असे. कारण राजाचें सैन्य ह्मणजे सरदारांचें सैन्य होय. यामुळे राजा हा नेहमीं सरदारांवर अवलंवून राही. सरदार जर राजाच्या विरुद्ध उठले तर राजाला त्यांचे विरुद्ध जाण्यास शक्ति नसे. ही पद्धति देशांमध्यें दंगेधोपे होत अशा काळीं चांगली होती. परंतु जातीनें हजर राहणें हें लोकांना बरेच संकटाचें वाटूं लागलें व औद्योगिक वाढीबरोबर व देशांतील शांततेच्या वाढीबरोबर ही लष्करी मोबदल्याची पद्धत नाहींशी होऊन हळूहळू पैशाच्या खंडाची पद्धत येत चालली. म्हणजे राजाला सरदारांच्याकडून शिपाई मागविण्यापेक्षां जमिनीबद्दल पैशाच्या रूपानें खंड घेऊन त्यांतून पगारी सैन्य ठेवणें हें आपल्या सामर्थ्यास व देशाच्या शांततेस जास्त सोईस्कर वाटूं लागले. सरदारांनाही जातीनें सैन्यांत जाणें व लोक जमवून सैन्याचे पथक तयार करणें यापेक्षां पैशाच्या रूपानें राजाला खंड देणे जास्त सुखावह वाटूं लागलें. राजाला पैसे देण्याकरितां त्यांनी आपल्या कुळांडून जमिनीच्या स्वामित्वाबद्दल पैशाच्या रुपानें खंड घेण्याची सुरुवात केली. प्रत्यक्ष शेत कसणारे आपल्या धन्यास पैशाच्या रूपानें किंवा ऐनजिनसी