हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ २०३ ]

यऊन पोंचली आहे; म्हणून आतां या मागनेिं हिंदुस्थानसरकारचें उत्पन्न वाढण्याची फारशी आशा नाहीं; तेव्हां आतां नवीन उत्पन्नाची गरज लागल्यास ती अप्रत्यक्ष कराच्या रूपानें काढली पाहिजे असें हिंदुस्थानसरकारास वाटूं लागल्याचीं चिन्हें भासत आहेत, यामुळें निरनिराळ्या जमीनधाऱ्याच्या पद्धतीला एक प्रकारचें कायम साऱ्याच्या पद्धतीचें स्वरूप येऊं पहात आहे ही शुभसूचक गोष्ट आहे. कारण हिंदुस्थानामध्यें शेतीच्या लागवडींत दुसऱ्या पुष्कळ अडचणींबरोबर सरकारच्या साऱ्याच्या वाढीची भीति ही एक अडचण आहे हें कबूल केलें पाहिजे व ही अडचण कालेंकरून नाहींशी होणार अशी लोकमताची खात्री झाली म्हणजे शेतकीचें पाऊल खात्रीनें पुढें पडल्याखेरीज राहणार नाहीं.

भाग अकरावा


चढाओढीनें ठरलेल्या वांटणीची असमता व ती नाहींशी करण्याचे उपाय.


 ‘वांटणी’ या पुस्तकाचा पूर्वार्ध पहिल्या दहा भागांत समाप्त झाला. औद्योगिक सुधारणेच्या शिखरास पोंचलेल्या देशांमध्यें संपत्तीच्या वांटणीचे मुख्य हिस्से अगर वांटे कोणते, व ते कोणत्या तत्वानें निश्चित होतात याचा आपण येथपर्यंत विचार केला. संपत्तीच्या प्रत्यक्ष उत्पत्तीस ज्या वर्गाचें प्रत्यक्ष साहाय्य होतें, त्या त्या वर्गामध्यें संपत्तीची प्रथम वांटणी होते. असे वर्ग म्हणजे जमीनदार, मजूर, भांडवलवाले व कारखानदार हे होत व या वर्गांच्या वांट्यांस येणाऱ्या संपत्तीला त्या त्या वर्गाचें वार्षिक उत्पन्न म्हणतात. तेव्हां हे उत्पन्नाचे प्रकार म्हणजे खंड अगर भाडें, मजुरी, व्याज व नफा होत. हें आतांपर्यंतच्या विवेचनावरून ध्यानांत आलेंच असेल. समाजाच्या बाल्यावस्थेमध्यें हे वांटे फारसे निरनिराळे झालेले नसतात व झाले असले तरी ते बहुधा रूढीनें ठरलेले असतात, परंतु समाजाच्या प्रगल्भावस्थेमध्यें हे वांटे चढाओढीनेंच ठरतात.