हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१४]

अटी व आपलें म्हणणे दुस-या पक्षास कबूल करण्यास लावण्याचा असतो, हें उघड आहे.
 अशा प्रकारचे संप औद्योगिक क्रांतीनंतर सर्व सुधारलेल्या देशांत झालेले आहेत. आज काय खाणींतील मजुरांनीं संप केला; तर उद्या काय गोदींतील कामदारांनीं केला; आज कापडाच्या गिरण्यांतील गिरणीकामदारांनीं गिरण्या बंद पाडल्या; तर उद्यां काय रेल्वेनोकरांनी आगगाड्यांची नेआण बंद केली; या प्रकारच्या हकीकती वर्तमानपत्र वाचणारांच्या कानीं नेहमीं येतात. हिंदुस्थानांतसुद्धां गेल्या पांचपंचवीस वर्षात किती तरी संप झालेले आमच्या वाचकांच्या स्मरणांत असतील; मुंबईतील म्युनिसिपालिटीच्या भंग्यांचा संप, रेल्वेवरील युरोपियन व युरेजिअन गाड्या हांकणारे व गाड्या चालविणारे यांचा संप, गिरण्यांतील मजुरांचा संप, रेल्वे तारमास्तर व स्टेशनमास्तर यांचा संप, भाडोत्री गाडी हांकणारांचा संप, अशा प्रकारचे किंती तरी संप आपल्या कानावरून गेलेले असतील.
 वरील उदाहरणांवरून प्रचंड कारखान्याची पद्धति व संप यांचा कार्यकारणभावसंबंध आहे हें तेव्हांच ध्यानांत येईल. ज्या ज्या देशांत प्रचंड कारखान्याची पद्धति प्रचलित होते त्या त्या देशांत संपाची पद्धतिही मागोमाग येतेच. घरगुती धंद्याच्या पद्धतींत या संपाला अवसर नसतो. म्हणजे ज्या वेळीं कारखानदार व मजूर असे मोठमोठे दोन वर्ग देशांत उत्पन्न होतात तेव्हां त्यांच्यामध्यें तंट्याभांडणास कारणें जास्त उद्भवतात व हीं भांडणें दुस-या रीतीनें सुटलीं नाहींत म्हणजे संप ह्या आणीबाणीच्या उपायाचा अवलंब मजुरांकडून होतो. कारखानदारांनीं मजुरांना नोटीस देऊन कारखान्यांत येण्याचा अटकाव केला केला तर त्याला बंदी म्हणावें अशा त-हेनें संप व बंदी असा भेद कांहीं लोक करतात. परंतु कारखानदारांकडून असें होण्याचे प्रसंग फारच थोडे असतात म्हणून संप व बंदी असा भेद करण्याचें फारसें प्रयोजन नाहीं, असें पुष्कळ ग्रंथकर्त्यांचें म्हणणे आहे व तें पुष्कळ सयुक्तिक दिसतें म्हणून या भागांत संप व बंदी असा भेद मानला नाहीं. पहिल्यांदां नोटीस कोणीही देवो परंतु कारखानदार व मजूर याच्यामध्यें बेबनांव होऊन कारखान्याचें काम बंद पडलें म्हणजे संप झाला असें म्हणण्यास कांहीं एक हरकत नाहीं.