हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२१७]

भांडवल मजुरीमध्यें खर्च झालेंच पाहिजे असा कांहीं नियम नाहीं. तसेंच धंद्याची भरभराट असली म्हणजे कारखानदारांना नफा पुष्कळ मिळत असतो व जर मजुरांनीं संप करून तो यशस्वी होऊन त्यांची मजुरी वाढली तर ती नफ्याच्या भागांतून वाढेल व त्याचेयोगानें दुस-या धंद्यांतील मजुरी कमी झालीच पाहिजे असें होत नाहीं.
 वरील विवेचनावरून संपापासून सामान्यतः नुकसानच जास्त होतें असें म्हणणें प्राप्त आहे. संप हा मुळीं संपत्तीच्या नाशाचाच एक मार्ग आहे, हें उघड आहे. कारण संपामध्यें संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांची विस्कटा-विस्कट होते व ज्याप्रमाणें एंजिनचीं चाकें एकमेकांपासून विलग झाली म्हणजे एंजिन बंद पडलेंच पाहिजे त्याप्रमाणें श्रम व भांडवलाच्या बेबनावामुळे संपत्तीच्या उत्पादनाचें प्रचंड यंत्र बंद पडलें पाहिजे व याचा परिणाम देशांतील सांपत्तिक स्थितीवर अनिष्ट झालाच पाहिजे हे उघड आहे. परंतु एखादें विष प्राणघातक असलें तरी त्याचा अल्पप्रमाणात व शरीराच्या रोगग्रस्त स्थितींत योग्य त-हेनें उपयोग केल्यास तें विषही उपकारकच होतें तींच स्थिति संपाची आहे. देशांतले कारखानदार फारच स्वार्थी झालेले असल; देशांतील कायदे मजुरांना प्रतिकूल व कारखानदारांना अनुकूल असले व एकंदर समाजांतील लोकमत उद्योगधंद्यांत तटस्थवृत्तीचें असलें म्हणजे मजूरवर्गाच्या साहजिक विस्कळतेमुळे व कारखानदारांच्या साहजिक एकोप्यामुळे मजुरीचे दर वाजवीपेक्षां कमी राहूं शकतात. म्हणजे अशा स्थितींत चढाओढीचे परिणाम दुर्बलांवर अनिष्ट होतात. व अशा वेळीं संपाखेरीज गत्यंतर नसतें; म्हणजे आणीबाणीच्या व एका दृष्टीनें संपत्तीला हानिकर अशा उपायांची योजना करण्याची अवश्यकता असते व या जालीम उपायांचा अशा वेळीं उपयोगही होतो. तोच उपयोग संपाचा होतो असें म्हणणें भाग आहे. अनिष्टापासून इष्ट निष्पन्न होतें अशी जी इंग्रजींत म्हण आहे त्याचें प्रत्यंतर या ठिकाणीं येतें.
 औद्योगिक क्रांतीच्या अव्वल अमदानींत कारखानदारांना ताळ्यावर आणण्यास या संपाचा अप्रत्यक्ष उपयोग होतो. म्हणजे जो संप हेतो तो यशस्वी होतोच किंवा मजुरांच्या मागण्या 'यांत कबूल केल्या जातातच अशांतला भाग नाहीं. प्रत्येक संपाचे सांपत्तिक परिणाम अनिष्ठच