हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२२५]

आहे असें मजूरपक्षाचें ह्मणणें आहे. या प्रश्नाबद्दल वाढतें लोकमत व कारखान्याचे कायदे यांनीही मदत केली आहे यांत शंका नाहीं. मजूरसंघाच्या प्रयत्नांनी कांहीं अंशीं ही इष्ट गोष्ट घडून आली आहे याचें उत्तम प्रत्यंतर असें आहे कीं, ज्या धंद्यांत अजून मजूरसंघ चांगल्या तऱ्हेने प्रस्थापित झालेले नाहीत त्या धंद्यांत कामाचे तास कमी झाले नाहीत. तेव्हां मजूरसंघाच्या या यशस्वी कृतीने मजुरांची स्थिति सुधारली आहे यांत शंका नाही. व धंद्यास अपाय न होतां आणखी कामाचे तास कमी करतां आले तर तें इष्ट आहे असें सर्वसाधारण मत आहे. ठरलेल्या वेळाच्या पुढें कोणत्याही मजुरानें काम करतां कामा नये या नियमाबद्दल मात्र पुष्कळ मतभेद आहे. या नियमानें हुरूपी व मेहनती मजुरांची जास्त मजुरी मिळविण्याची संधि नाहींशी होते. परंतु यावर उत्तर असें आहे कीं, हा नियम हितकर आहे. कारण याच्यायोगानें साधारण मनुष्याचा तोटा न होतां मेहनती मजुरांनाही जास्त मजुरी मिळविण्याच्या बुद्धीनें आपल्या शक्तीबाहेर श्रम करण्याचा जो मोह उत्पन्न होण्याचा संभव असतो त्यापासून त्यांची मुक्तता होते.
 मजूरसंघाच्या दुस-या कार्यक्रमाच्या उपयुक्ततेबद्दल तर वादच नाहीं. मजुरांच्या हिताकरितां जे निरनिराळे फंड मजूर-संघ बनवितात, त्यानें मजुरांची सांपत्तिक स्थिति किती तरी सुधारली आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. कुटुंबांतील मनुष्य मेल्यास त्याच्या औधर्वदेहिकास पैशाची मदत करणें; मजुराला अपघात झाल्यास अगर तो आजारी पडल्यास त्याला दर आठवड्याच्या आठवड्यास पैशाच्या रूपानें मदत करणें; काम न मिळाल्यास मदत करणें; तसेंच ज्या ठिकाणीं मजुरीचे दुर चांगले आहेत अशा ठिकाणीं जाण्यास उतेजन देणें व शेवटीं मजुरांना वयातीतपणाबद्दल पेन्शन अगर देणगीवजा एकदम कांहीं रकम देणें, या गोष्टी मजुरांची स्थिति सुधारतात व त्यांना अडचणींतून सोडवितात हें उघड आहे. व या सर्व गोष्टी मजूर खरोखरी आपल्याच पैशानें करतो. ज्याप्रमाणें आयुष्याचा विमा उतरल्यापासून लोकांचें फार कल्याण होतें, त्याचप्रमाणें अशा प्रकारच्या तरतुदीनेंही होतें. यावरून मजूरसंघाच्यायोगानें मजुरांमध्यें काटकसर,दूरदर्शीपणा व स्वावलंबन या गुणांचा किती प्रसार झाला आहे हें दिसून येईल.