हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२३२]

न्यांत मन लागण्यास व त्याला काळजीपूर्वक काम करण्याची बुद्धि होण्यास सबळ कारण नसतें. कां कीं, त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी नसते. कराराप्रमाणें ठरलेले तास कसेंबसें काम केलें कीं झालें. त्याला ठरलेली मजुरी मिळावयाचीच. बरें, जो जास्त काळजीनें काम करील त्याला अधिक फायदा आहे काय? कांहीं नाहीं. त्यालाही इतरांप्रमाणें मजुरी मिळणार. ज्याप्रमाणें शेतीचा मालक या नात्यानें शेत कसणारा व मजूर म्हणून शेत कसणारा यांच्या श्रमांत फार तफावत पडते-कारण एकाला आपल्या श्रमाचे सर्व फळ आपल्यालाच मिळणार ही खात्री असते; दुस-याचा शेताच्या उत्पन्नाशीं कांहीं एक संबंध नसतो-त्याचप्रमाणें भाडोत्री मजूर व मालकीची भावना असणारा मनुष्य यांच्या श्रमामध्यें तफावत असते व या नफ्याच्या वांटणीच्या तत्वानें कांहीं अंशीं तरी मजुरांचा भाडोत्रपिणा कमी होऊन त्यांना कारखान्याबद्दल एक प्रकारचा आपलेपणा वाटू लागतो व यामुळे कारखान्याच्या यशस्वीपणाबद्दल काळजी वाटूं लागते व ह्मणून अशा मजुरांचे हातून काम मोठ्या हौसेनें, हुरूपानें, कळकळीनें व काळजीनें होतें व अर्थात् श्रमाची कर्तबगारी वाढून मालाची वाढ पुष्कळ होते व त्या मानानें नफाही फार पुष्कळ वाढतो.
 सहकारी तत्वाइतका या तत्वाचा प्रसार झाला नाहीं. परंतु ज्या ज्या धंद्यांत नफ्याच्या वांटणीचें तत्व स्वीकारलें गेलें आहे तेथें तेथें कारखानदार व मजूर या दोघांच्याही उत्पन्नांत भर पडली आहे यांत शंका नाहीं. परंतु या तत्वासंबंधींचा पुढाकार कारखानदारांना घ्यावा लागतो व त्यांना स्वतःच्या हिताच्या दृष्टीनें त्याची इतकी जरुरी नसते. यामुळे सहकारी तत्वाइतका या दुस-या तत्वाचा प्रसार झालेला नाहीं व होणेंही शक्य नाहीं.
 नफ्याच्या वांटणीच्या तत्वाचा पुढाकार मजुरांस घेतां येत नाहीं हें वर सांगितलेंच आहे. त्यामुळे हें तत्व वास्तविक स्वावलंबनाच्या उपायमध्यें अन्तर्भूत होत नाहीं. तरी पण उत्पादक सहकारितेच्या पद्धतीशी त्याचें थोडेसें साम्य आहे म्हणून त्याचा या भागांत विचार केला आहे.
 मनुष्यामध्यें शिक्षणाच्या योगानें एकदां स्वतःच्या दुःस्थितीची जाणीव व ती स्थिति सुधारण्याची इच्छा उत्पन्न झाली ह्मणजे मनुष्य सर्व दिशांनीं प्रयत्न करूं लागतो व इंग्लंडांतील व युरोपांतील इतर देशांतील मजुरांची