हे पान प्रमाणित केलेले आहे.
[२३५]

होऊन मजुरांची स्थिति कारखानदाराइतकी चांगली नसते व समाजांत जी विषमतेनें संपत्तीची वांटणी होते, तिचा प्रतिकार करण्याकरितां मागील दोन भागांत वर्णिलेल्या संस्था व तत्वें इंग्लंडमध्यें प्रथमतः उद्भवलीं हें योग्यच झालें.
 या भागांत वर्णन करावयाची संस्था अगर पद्धति ही मात्र इंग्लंडांत झालेली नाहीं. या पद्धतीच्या शोधाचा मान जर्मनीकडे जातो. सहकारी पतपेढ्यांचें तत्व उदयास आल्याला कोठे बासष्ट वर्षे झालीं आहेत. परंतु या अवघ्या दोन पिढ्यांच्या काळांत त्यानें जगांत मोठी क्रांति करून सोडली आहे. जगांत ही एक गरीब लोकांचें दुःख नाहींसें करणारी, त्यांची पत वाढविणारी, नवीन संपत्ति उत्पन्न करणारी, प्रचंड शक्ति अवतरली आहे. हें तत्व ज्या वर्षीं उदयास आलें त्याच सालीं कालिफोर्नियांतील सोन्याच्या खाणीचा शोध लागला. परंतु जड सोन्याच्या खाणींनं जगांत भांडणें, तंटे व कलह मात्र उत्पन्न केले. परंतु या तत्वानें जगाचें कल्याण करून त्यांत शांतता, समाधान व सुख उत्पन्न केलें; इतका एका वेळीं शोध लागलेल्या या दोन गोष्टींमध्यें विरोध आहे.
 सहकारी पतपेढ्यांच्या तत्वाचा शोध प्रथमत: जर्मनींत लागला हें वर सांगितलेंच आहे. व जर्मनीची परिस्थिति या तत्वाच्या शोधास अनुकूल अशी होती. जर्मनीमध्यें इंग्लंडची प्रचंड शेतकीची पद्धति नव्हती. तर तेथें शेतकरी आपल्या लहान लहान शेतांवर शेतकी करून आपलें पोट भरीत. हा वर्ग फार दरिद्री होता इतकेंच नव्हे तर जबर व्याजाच्या कर्जापायीं बुडतही होता. या वर्गाजवळ आपली शेती सुधारण्यास भांडवल नव्हतें. व त्यानें भांडवल कर्जाऊ घ्यावें तर त्याची पत नव्हती. हीच बहुतेक स्थिति घरगुती स्थितींतील कामगार व धंदेवाले लोक यांची होती. तेव्हां या लोकांची सांपत्तिक स्थिति कशी सुधारावयाची हा मोठा बिकट प्रश्न होता. इंग्लंडांतील प्रश्नापेक्षां हा प्रश्न अगदीं वेगळा होता हें उघड आहे. इंग्लंडमध्यें मजूरवर्गाला मजुरी कमी मिळे तेव्हां मजुरी कारखानदारांकडून मिळविण्याकरितां त्यांनीं मजूरसंघ काढले. परंतु या लोकांची स्थिति निराळीच होती. हे स्वतंत्र धंदेवाले होते खरे; परंतु यांना संपत्ति उत्पन्न करून आपली सुधारणा करण्याची सोय नव्हती. कारण त्यांचेजवळ भांडवलही नव्हतें व कर्जाऊ भांडवल घ्यावें तर पतही