या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २३९] जाऊं नये असा असतो. वर सांगितलेंच आहे कीं, जेथें भागानें भांडवल जमवितात तेथें बहुधा प्रत्येकाच्या भागाच्या किंमतीइतकी किंवा त्याच्या कांहीं एका ठराविक पटीइतकीच तोट्याची जबाबदारी सभासदावर असते. जेथें भाग नसतात किंवा ते फारच लहान असतात तेथें बहुधा अमर्यादित जबाबदारी असते. अशा त-हेनें पेढी स्थापन झाली ह्मणजे सुखवस्त लोकांकडून व सभासदांकडून पेढीत ठेवी घेण्याची तजबीज केली जाते व पेढी चांगल्या सचोटीच्या लोकांच्या हातांत असली ह्मणजे ती विश्वासास पात्र होऊन लोक त्यांत ठेवी ठेवू लागतात व देशांतील गरीब लोकांना अप्रत्यक्ष रीतीनें मदत करण्याची ही एक नवी सोय सुखवस्तू व श्रीमंत लोकांना होते. कारण यांत स्वार्थ व परमार्थ असे दोन्हीही साधतात. आपल्या ठेवीवर थोडेसें व्याज मिळून त्याच्यायोगानें या पेढ्यांना जरूर भांडवलाचा पुरवठा होते. या पेढ्यांचा भांडवल जमविण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पेढीच्या संयुक्त पतीवर-व वर सांगितलेल्या कारणानें ही पत संघशक्तीनें व अमर्यादित जबाबदारीच्या तत्वानें व सभासदांच्या योग्य निवडीनें फार वाढते-कर्ज काढणें हा होय. शिवाय प्रत्येक पेढी आपल्या नफ्यांतून रिझर्वफंड मागें टाकीत असते. कालेंकरून हें भांडवलही मोठे होऊन त्याचा पेढीला मोठा उपयोग होऊं लागतो. याप्रमाणें ठेवी आपल्याकडे ओढून घेणें, आपल्या संयुक्त पतीवर कर्ज काढणें व शेवटीं आपल्या नफ्यांतील शिल्लक मागें टाकून रक्कम जमविणें, हे तीन भांडवल जमविण्याचे मार्ग झाले.आतां कर्ज देण्याची पद्धति पहा.अशा पेढ्यांचा पहिला नियम हा असतो कीं, नवीन सभासद कारतांना त्याच्या दानतीबद्दल, त्याच्या सचोटीबद्दल व त्याच्या हेतूबद्दल चांगली चवकशी करून मग त्याला सभासद करावयाचा व जें कर्ज द्यावयाचें तें सभासदांखेरीज दुस-यांना द्यावयाचें नाहीं. कर्ज देतांना कर्ज कशाकरितां पाहिजे, याची पेढीच्या व्यवस्थापक मंडळीला चौकशी करण्याचा अधिकार असतो. बैल घेण्याकरितां, बियाण्याकरितां, जुनें जबर व्याजाचें कर्ज फेडण्याकरितां, विहीर खणण्याकरितां किंवा एखादं शेतीचें आऊत घेण्याकरितां किंवा दुस-या एखाद्या उत्पादक कामाकरितां कर्ज दिलें जातें. हें कर्ज हातावरच दिलें जातें; याला तारण जमीन वगैरे लावून घेत नाहींत. फक्त शेतक-याकडून एक चिठ्ठी करून घेतात. व्यवस्थापक मंडळीला शेतक-याच्या उद्देशाबद्दल