हे पान प्रमाणित केलेले आहे.
[१५]

मनुष्याला आपल्या श्रमाचें फळ उपभोगण्याचा हक्क आहे. तसेंच प्रत्येक मनुष्याला आपल्या श्रमाचा होईल तितका फायदा करून घेण्याचा हक्क आहे. प्रत्येक मनुष्याला आपलें हित कशांत आहे हें समजतें व त्याला आपल्या या हिताचा मार्ग पत्करण्याचा हक्क आहे. समाजाचें हित व व्यक्तीचें हित यामध्यें विरोध नाहीं. फ्रेंच तत्वज्ञान्यांच्या व निसर्गपंथाच्या मतें हीं तत्वें स्वयंसिद्ध आहेत, व या तत्वांवरून त्यांनीं आपलीं अर्थशास्त्रविषयक कांहीं प्रमेयें व विशेषतः अप्रतिबंध व्यापाराचें तत्व सिद्ध केलें आहे. मनुष्याचे वरीलप्रमाणें हक्क असल्यामुळे त्याला उद्योगधंद्यास पूर्ण मुभा असली पाहिजे. त्याला वाटेल त्याप्रमाणें आपल्या श्रमाचा मोबदला मिळण्याची संधि पाहिजे. व्यापाराच्या कामांत पूर्ण चढाओढ व करार यांचा अंमल पाहिजे. सरकारला व्यापारांत ढवळाढवळ करण्याचा हक्क नाहीं. सरकारचें काम म्हणजे त्यांनीं मानवजीवित व मालमत्ता यांना सुरक्षितता देणें व त्यांचें संरक्षण करणें इतकेंच आहे. उद्योगधंदे व व्यापारउदीम यांसंबंधीं सरकारनें कायदेकानु करण्यापासून देशाचा फायदा नसून उलट नुकसान आहे. कारण व्यक्तीचें व समाजाचें हित हीं परस्पर विरुद्ध नसावींत व प्रत्येक व्यक्तीला आपलें हित कशांब आहे हें समजण्याचें सामथ्र्य असावें अशी मुळीं ईश्वरी येजनाच आहे. यामुळे व्यापारउदीमाच्या बाबतींत व्यक्तीस पूर्ण मुभा असण्यांत देशाचें हित आहे व व्यक्तिस्वातंत्र्यावरच देशाची सांपत्तिक भरभराट अवलंबून आहे.
 या वरील विवेचनावत्रून निसर्गपंथाचा सर्व रोंख उदीमपंथांविरुद्ध कसा होता हें स्पष्ट होईल. उदीमपंथाचें संरक्षक धोरण होतें. लणजे त्या पंथाचें मत व्यापारउदीम यावर सरकारचा दाब पाहिजे; व सरकारनें संरक्षणाचें तत्व अंगीकारिलें पाहिजे, तरच देशाची सांपत्तिक स्थिति सुधारेल असें होतें. तर निसर्गपंथाचे मताप्रमाणें जें जें होईल तें तें पाहावें हेंच सरकारचें खरें धोरण व यानेंच देशाची सांपत्तिक स्थिति सुधारणार.
 निसर्गपंथी लोकांची संपत्तीच्या स्वरूपाची व त्याच्या कारणांची कल्पनाही उदीमपंथी लोकांच्यापेक्षां निराळी होती. त्यांचे मतें देशाची संपति वाढविणारा धंदा शेतकीच होय. जमिनीचे मालक व शेतकरी एवढेच समाजांतले का वर्ग धनोत्पादक आहेत. कारण शेतकीच्या उत्पन्नांतून श्रमाचा पूर्ण मोबदला मिळून व भांडवलाचें व्याज व