या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २५९ ]

रांचा. हा निकामी मजुरांचा वर्ग‘चांगल्या मजुरीच्या'दराच्या काळांत अविचारानें झालेल्या लग्नामुळे होतो असें अभिमतपंथी अर्थशास्त्राचें मत आहे. परंतु या उपपत्तीमध्यें एक गोष्ट विसरली जाते ती ही कीं, नवी मजुरांची लोकसंख्या होण्यास १८ वर्षे लागतात. व या मोठ्या अवधींत मजुरीच्या दरांत किती तरी वेळां कमीअधिकपणा होऊन गेलेला असतो. यावरून जास्त मजुरीच्या योगानें लोकसंख्या वाढते हें म्हणणें खरें नाहीं. व्यापाराच्या मंदीतेजीप्रमाणें धंद्यांत भांडवल कमीअधिक जातें यामुळें लोकसंख्य़ा फाजील झाली आहे असा केव्हां केव्हां भास होतो.
कार्ल मार्क्सच्या पुस्तकाचा थोड्या विस्तारानें सारांश दिला आहे. कारण सामाजिक पंथाच्या ब-याच शाखेवर मार्क्सच्या मताची छाप आहे. समाईक सामाजिक पंथ, संयुक्त सामाजिक पंथ हे मार्क्सच्या मताचींच निरनिराळीं प्रतिबिंबे होत. अभिमतपंथाच्या कांहीं प्रमेयांपासून व विशेषतः रिकार्डोच्या मोलाच्या एककल्ली उपपत्तीपासून मार्क्सच्या मताचा उगम झालेला आहे हें वाचकांच्या सहज ध्यानांत आलें असेल. सर्व संपत्ति श्रमानें उत्पन्न होते व भांडवलवाले हे मधल्यामध्य़ेंच सर्व नफा उपटतात व श्रमाचा योग्य मोबदला मजुरांस देत नाहींत व हा खासगी मालकीच्या संस्थेचा परिणाम होय. तेव्हां जमिनीवरील खासगी मालकी नाहींशी करून सर्व जमीन राष्ट्रीय मालकीची करणें तसेंच सर्व भांडवल व कारखाने सरकारी करणें वगैरे प्रकारचे उपाय मजुरांची स्थिति सुधारण्याकरितां सामाजिक पंथाचे लोकांनीं पुढे आणलेले आहेत.
मार्क्सच्या नंतर परंतु कांहीं अंशी त्याच्या शिकवणीनें सामाजिक पंथ क्रांतिमूलक होत चालला. कारण त्यानें सुचविलेले उपाय त्या काळचीं सरकारें अंमलांत आणण्यास तयार नव्हतीं. तेव्हां हीं सरकारें नाहींशीं करून त्यांचे जागीं नवी राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा उपक्रम कांहीं समाजपंथी लोकांनीं केला, व याच्याच पुढली पायरी ह्मणजे अराजक पंथ होय.
बकुनिन व प्रूढो हे या पंथाचे जनक होत. यांचे मतानें खासगी मालमत्ता ही निवळ चोरी आहे. व ही संरक्षण करण्याचें काम सरकार करतें. तेव्हां जर खासगी मिळकतीची कल्पनाच मुळीं समाजांत असमता