या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ २७५१] देशांतील निरनिराळ्या वर्गामध्यें असमतेची वांटणी होण्याचें तिसरें कारण दायभागासंबंधीं कायदे होत. खासगी मिळकतीचा स्वाभाविक परिणाम समाजांतील असमता वंशपरंपरेची करण्यांत होतो. विशेषतः बापाची मिळकत ज्येष्ठ मुलाला वंशपरंपरेनें जाण्याची जी पद्धति आहे त्यामुळे ही विषमता वंशपरंपरेनें चालते. एका मनुष्यानें पुष्कळ संपत्ती मिळविली कीं ती पिढयानुपिढ्या एकाच घराण्यांत राहते व या मालमत्तेवर ऐदी लोक पोसले जातात. तेव्हां या पद्धतींत फरक घडवून आणणें जरूर आहे अशी एक सामाजिकपंथी सूचना आहे व त्यांपैकीं एक अगदीं सुलभ उपाय ह्मणजे दायभागावर कर ठेवणें ही होय. यायोगानें बहुजनसमाजावरील कराचें ओझें न वाढवितां सरकारला एक उत्पन्नाची बाब होते व हा कर ज्या माणसाला बिनश्रमानें एकदम पुष्कळ संपत्ति मिळते त्यावरच पडतो. तेव्हां तो कोणत्याही त-हेनें अन्यायाचा न वाटतांना समाजांतील विषमता अल्पांशाने तरी कमी करण्यास कारणीभूत होतो. ' दायभागावरलि कर ' ही एक चांगली व न्यायाची उत्पन्नाची बाब आहे असें सर्व सुधारलेल्या सरकारचें मत आहे असें त्यांच्या कृतीवरून दिसतें. कारण हा कर वाढविण्याची सर्वत्र प्रवृत्ति दिसत आहे. गेल्या सालीं ज्याच्याबद्दल इंग्लंडमध्यें रणें पडलीं होतीं त्या इंग्लंडच्या प्रसिद्ध बजेटांत हां करही बराच वाढविण्यांत आला आहे हा एक वादाचा प्रश्न होता. हिंदुस्थानांत प्रोबेट मिळविण्याकरितां जो स्टांप भरावा लागतो त्याचें तत्वही हेंच आहे. तेव्हां ही सामाजिकपंथी सूचना सर्व सुधारलेल्या सरकारनीं घेतली आहे असें ह्मणण्यास हरकत नाहीं, देशामध्यें संपत्तीची असम वांटणी होण्याचें चवथें कारण शिक्षणाचा खर्च होय. देशाच्या आधिभौतिक सुधारणेबरोबर शिक्षणाला महत्व आलें आहे व देशांत संपत्तीची उत्पत्ती वाढवण्याचें एक प्रत्यक्ष कारण शिक्षण होय हें दुस-या पुस्तकांत सांगितलेंच आहे. परंतु देशाच्या सुधारणेबरोबर शिक्षणाचा खर्च व धंदा शिकण्याचा खर्च वाढत जातो. यामुळे या शिक्षणाचा फायदा गरीब लोकांना घेतां येत नाहीं व म्हणून जरी त्यांचेमध्यें उत्तम गुण असले तरी त्यांचा उपयोग करण्याचा त्यांना अवसर मिळत नाहीं. या शिक्षणाच्या फाजील खर्चाचा परिणाम श्रीमंताला