या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२९६] G कामा नये. कांहीं कांहीं अर्थशास्त्रकारांनीं सर्व अर्थशास्त्राला गणितासारखें विशिष्ट परिमाणांचें रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे.निसर्ग पंथाच्या कालींही असा प्रयत्न झालेला होता व कुर्ने या फ्रेंच ग्रंथकारानें अर्थ शास्त्रावर जो ग्रंथ लिहिला आहे,त्यामध्ये गणितांतील पुष्कळ समीकरणे आणिली आहेत. परंतु अर्थशास्त्राचा विषय इतका संकीर्ण व संमिश्र आहे की, त्यामध्ये गणितांतील प्रमेयाइतका नियतपणा येणे शक्य नाहीं हें ध्यानांत ठेविलें पाहिजे. गणितांतील प्रमेये दाखल्याकरितां अर्थशास्त्रांत उपयोगी पडतील. परंतु अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना गणितशास्त्रातील सिद्धांतांइतकें नियत स्वरूप येणार नाहीं हें खास . म्हणूनच जेव्हन्स वगैरेंसारख्या अर्थशास्त्रज्ञांनीं आवशेषिक उपयुक्तता, सकल उपयुक्तता वगैरे जे सूक्ष्म भेद काढले आहेत त्याचा म्हणण्यासारखा उपयोग आहे असे वाटत नाही. अर्थशास्त्रांत महत्त्वाची कल्पना व गोष्ट म्हणजे पदार्थाच्या किंमती कशा ठरतात हे पाहणे ही होय व हा अर्थशास्त्रांतील महत्त्वाचा भाग आहे यांत शंका नाही. तेव्हां पुढील विवेचनास आरंभ करण्या- पूर्वी किंमतीमधील दोन पोटभेद लक्षात ठेविले पाहिजेत; ते भेद हे-वस्तूची बाजारकिंमत अगर बाजारभाव व मूळ किंमत. वस्तूचा बाजारभाव हा क्षणोक्षणी बदलणारा असतो. एखाद्या वस्तूला सकाळीं जो भाव असेल तो संध्याकाळी असणार नाहीं; त्यात थोडा फार फरक होईल. वस्तूची मूळ किंमत म्हणजे ती वस्तु उत्पन्न करण्यास लागलेला सर्व खर्च. वस्तूची मूळ किंमत ही त्याची स्थिर किंमत आहे.माल उत्पन्न करण्याच्या पद्धतीत फरक झाल्याखेरीज त्यामध्ये फारसा होत नाही. तेव्हां बाजारभावाच्या मानानें ती जास्त स्थिर असते. ज्या किंमतीजवळ बाजारभाव हेलकावे खात राहतात,ती मूळ किंमत होय. अर्थात् पदार्थाच्या या दोन किंमती परस्परां पासून भिन्न आहेत अशांतला भाग नाहीं. बारकाईने पाहतां बाजारभाव मूळ किंमतीवर अवलंबून आहे. म्हणजे बाजारभाव कायमचा मूळ किंमतीच्या खाली जाणारच नाही. तो तात्पुरता मूळ किंमतीच्या हवा तितका वर चढेल. पदार्थाच्या या दोन किंमती दोन प्रकारच्या कारणांवर अवलंबून आहेत. बाजारभाव हे क्षणिक व तात्कालिक कारणावर अवलंबून असतात, तर मूळ किंमत ही कायमच्या कारणांवर अवलंबून असते. तेव्हां प्रथमतः बाजारभाव कोणत्या कारणावर अवलंबून असतात हें पाहिले पाहिजे. हीं