या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[२९८] अदलाबदल चालत असावी अशा प्रकारची माहिती निरनिराळ्या देशांतील अगदी जुन्या काळच्या ग्रामसंस्थांच्या इतिहासकारांनी नमूद केलेली आहे. परंतु जसजशी समाजांत संपत्तीचीं वाढ होत गेली तसतसें या बाजाराचे महत्त्व वाढत गेलें व प्रत्येक गांवांत बाजारपेठ म्हणून एक प्रमुख भाग झाला व त्याला कायमचे स्वरूप आले. आतां या शब्दामध्ये ज्या गोष्टींचा किंवा विशेष गुणांचा अन्तर्भाव होतो त्याचा विचार केला पाहिजे. बाजार या संज्ञेमधील पहिला गुण म्हणजे यांतील व्यवहाराचा खुलेपणा अगर प्रसिद्धपणा होय. बाजारांत देवारी-घेवारी एकत्र जमतात व मलाची अदलाबदल किंमतीवारून उघड रीतीने चवाठ्यावर होते. येथे छपवाछपवीच्या व्यवहारास अवसर नसतो. या बाजारावर देखरेख करणें हे सरकारचे कर्तव्यकर्म समजले जात असे. या बाजारांत ठकबाजी न व्हावी, कोणी कोणास फसवू नये, सर्व व्यवहार खुल्या तऱ्हेने व उघड्या तऱ्हेने व्हावा अशाबद्दल जास्त काळजी घेतली जात असे. बाजाराच्या कल्पनेत अन्तर्भूत होणारा दुसरा गुण म्हणजे चढाओढीने ठरलेल्या किंमती होत. येथे निरानराळ्या ठिकाणांहून दुकानदार व गिऱ्हाईक जमतात.आतां अशा ठिकाणी दोन्ही वर्गामध्ये चढाओढ सुरू असते.दुकानदारांना आपला सर्व माल संपून जावा व आपल्याला चांगल फायदा मिळावा अशी इच्छा असते. यामुळे त्यांची आपआपसांत गिहाईक मिळविण्याची चढाओढ चालू असते. तसेच गिऱ्हाईकांची आप ल्याला चांगला माल स्वस्तांत मिळावा म्हणून खटपट चालू असते. यामुळे चढाओढ हा बाजाराचा आत्माच आहे असें म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे येथे मालाच्या किंमती चढाओढीने ठरल्या जातात. आज बाजारांत जर मालाला एक दर असला तर पुढच्या बाजाराला तोच राहील असा नियम नाही. कारण हे भाव घेवारी व देवारी यांच्या चढाओढीने ठरतात. बाजाराचा तिसरा विशेष हा वरच्या गुणाचाच परिणाम होय. बाजारांत अशा प्रकारची चढाओढ असल्यामुळं येणें व्यवहाराची पूर्ण मुभा अगर मोकळीक असते. बाजारांत माल आला म्हणजे त्याला नेहमीचे नियम किंवा प्रतिबंध लागू नसतात. येथे सर्व व्यवहार खुल्या तत्वावर चालतो. निरनिराळ्या धंद्यांमध्ये पूर्वी युरोपांत वणिकश्रेणी असत. त्या