या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३०२] ती मागणी म्हणतां येईल व अशा परिणामकारी मागणीचा किंमतीवर परीणाम होईल.

अर्वाचीन अर्थशास्त्रज्ञ पुरवठा व मागणी हे शब्द खालील विशेष अर्थानें वापरतात. एका विवक्षित किंमतीला मागितलेल्या मालाचें परिमाण म्हणजे मागणी होय व एका विवक्षित किंमतीला विकावयाला आलेल्या मालाचें परिमाण म्हणजे पुरवठा होय. देशांतील सर्व माल म्हणजे पुरवठा नव्हे; तर एका विवक्षित किंमतीला विकावयाला काढलेला माल म्हणजे पुरवठा होय. तसेंच देशांतील सर्व खर्चिक लोक यांची वासना म्हणजे ही मागणी नव्हे; तर एका विवक्षित किंमतीला ज्याचा खप होईल असा माल म्हणजे मागणी होय. आतां मागणी व पुरवठा यांचे खालील नियम ठरतात.

'जसजशी मोलाची किंमत कमी होते (दुस-या गोष्टी तशाच आहेत असें गृहीत धरून) तसतसे मागितलेल्या मालाचें परिमाण वाढतें. उलटपक्षीं जसजशी मालाची किंमत वाढते तसतसें मागितलेल्या मालाचें परिमाण कमी होतें; अर्थात किंमतीच्या कमीअधिक प्रमाणावर मागणीचा जास्त कमीपणा अवलंबून आहे. म्हणजे किंमत व मागणी हीं व्यस्त प्रमाणांत आहेत. '

या नियमाचीं उदाहरणें हवीं तितकीं आहेत. एखाद्या मालावर सरकारनें जास्त कर बसविला म्हणजे त्या मालाचा खप कमी होतो. कारण कराच्या योगानें त्या मालाची किंमत वाढते व वरील नियमाप्रमाणें किंमत वाढली कीं, मागणी कमी होते. उलटपक्षीं मालावरील कर कमी केल्यानें मालाची किंमत कमी झाली कीं मालाचा खप वाढतो. यामुळें कधींकधीं एखाद्या मालावरील कर कमी केल्यास सरकारचें कराचें उत्पन्न कमी न होतां तें वाढतच जातें. याचें हिंदुस्थानांतील ताजें उदाहरण म्हणजे मिठावरील कर होय. पूर्वी हा कर २॥ रुपये मण इतका होता तोच आतां १ रुपया मण इतका आहे. यामुळे मिठाचा खप किती पटींनी वाढला आहे व सरकारचें उत्पन्नही शेवटी वाढेल यांत शंका नाहीं.

पदार्थांच्या किंमती वाढल्या म्हणजे त्यांची मागणी कमी होते; तसेंच मालाच्या किंमती कमी झाल्या म्हणजे मागणी वाढते ही गोष्ट नेहमींच्या व्यवहारांत नेहमीं दृष्टोत्पत्तीस येते. बाजारांत लिलांवानें मालाच्या किंमती ठरविण्याची जी रीत प्रचलित आहे त्यावरून वरच्या विधानाची सत्यता