या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३०४

या नियामाचीं उदाहरणेही हवी तितकीं आहेत. कांहीं कारणांनी मालाच्या किंमती कमी झाल्या म्हणजे व्यापारी माल विकीनासे होतात. म्हणजे विक्रीस पुढें आलेला पुरवठा कमी होतो. पुढें किंमत वाढेल या आशेनें किंवा दुस-या एखाद्या बाजारांत पाठविण्याच्या आशेनें व्यापारी माल मागें घेतात. तसेंच मालाची किंमत वाढली म्हणजे पुष्कळ देवारी माल विकण्यास तयार होतात, कारण त्यांना प्रत्यक्ष जास्त फायदा मिळतो.

आतां मागणी व पुरवठा यांचे वेगवेगळे नियम एकत्र केले म्हणजे मागणी व पुरवठ्याचें खालील समीकरण ठरतें. "कोणत्याही बाजारांत मालाची किंमत अशी ठरते कीं, त्या किंमतीला मागितलेल्या मालाचें परिमाण त्या किंमतीला विकावयांस काढलेल्या मालाच्या परिमाणाबरोबर होईल; व हें समीकरण घडवून आणणारी शक्ति म्हणजे चढाओढ होय." म्हणजे बाजारांत देवारी व घेवारी यांच्यामध्यें चढाओढ चालते व ही चढाओढ एका किंमतीला मागितलेला माल व विकावयास काढलेला माल यांची बरोबरी होईपर्यंत चालते. मागणी व पुरवठा यांचें हें समीकरण मागणी व पुरवठा यांच्या पृथक नियामावरून झालेले आहे व या सर्वामध्ये एक सामान्य तत्व गृहींत धरलें आहे. तें हें कीं,किंमतीच्या प्रत्येक चलबिचलीबरोबर मागणी व पुरवठा यांत फरक होत जातो.

येथपर्यंत मागणी व पुरवठा यांच्या किंमतीशी कसा संबंध आहे हें दाखविलें.त्यावरून मागणी व पुरवठा हीं किंमतीवर अवलंबून आहेत असें दिसून येईल .या विवेचनांत मागणी व पुरवठा हीं किंमतीची कार्ये आहेत असें दिसतें.परंतु मागणी व पुरवठा आणि किंमती यामध्ये एकेरी कार्यकारण संबंध नाही. तर हा संबंध दुहेरी आहे व सामान्य लोकांच्या कल्पनेप्रमाणें तर मागणी व पुरवठा हीं किंमतीचीं कारणें आहेत व किंमत हें वरील कारणांचें कार्य आहे. परंतु वास्तविक प्रकार दुहेरी आहे म्हणजे मागणी व पुरवठा यावर किंमत अवलंबून आहे, व किंमत ही मागणी पुरवठा यांवर अवलंबून आहे. यांपैकी दुस-याचे नियम येथपर्यंत सांगितले. परंतु वरच्याप्रमाणेंच पहिल्याचे नियम ठरतात. म्हणजे मागणीची वाढ झाली म्हणजे किंमतीची वाढ होते. मागणीची वाढ म्हणजे त्याच किंमतीला मागितलेल्या मालाच्या परिमाणांतील वाढ व पुरवठ्याची