या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३०६ ] पुरवठ्याची वाढ होण्याचीं कारणें म्हणजे संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांतील वाढ होय व त्याचा विचार मागील एका भागांत केलाच आहे. तेव्हां त्याची येथें पुनरावृत्ति करण्याचें प्रयोजन नाहीं.

येथपर्यंत मालाचे बाजारभाव कोणत्या सामान्य तत्वावर ठरविले जातात याचा विचार झाला. हे बाजारभाव वारंवार बदलणारे असतात. अर्थात ते चंचल असतात व ते मागणी व पुरवठा यांच्या चलबिचलीवर अवलंबून असतात. परंतु किंमतींतील ही चलबिचल कांहीं एका विशिष्ट किंमतीसभोंवतीं फिरत असते, त्याला मालाची मूळ किंमत म्हणतात. केव्हां केव्हां बाजारभाव या मूळ किंमतीच्या जरा खालीं जातील तर केव्हां केव्हां या मूळ किंमतीच्या वर जातील. परंतु बाजारभाव मूळ किंमतीच्या ठिकाणी फारच क्वचित असूं शकतो. बाजारभाव व मूळकिंमत यांना समुद्राच्या पाण्याच्या सपाटीचें व लाटांचें साम्य चांगलें शोभतें. वा-यानें समुद्रावर सारख्या लाटा उसळत असतात. यामुळें पाण्याच्या सपाटीच्या खालीं एक लाट जाते तर एक वर जाते. म्हणजे समुद्राचा पृष्ठभाग नेहमीं वर खालीं होत असतो. परंतु हें वर खालीं होणें हें लाटा व त्यांचें कारण वारा यांवर अवलंबून आहे; तर समुद्राची सपाटी ही पाण्याचा सामान्य गुण जो स्थितिस्थापकता त्यावर अवलंबून आहे, त्याचप्रमाणें मालाचे बाजारभाव मागणी व पुरवठा यांवर अवलंबून आहेत. परंतु मूळकिंमत ही जास्त कायमच्या कारणांवर म्हणजे माल उत्पन्न करण्यास लागणा-या खर्चावर अवलंबूनं आहे. तेव्हा आतां पदार्थांच्या मूळ किंमती कशावर अवलंबून आहेत हें पाहेिलें पाहिजें व त्याचा विचार पुढील भागावर टाकणें भाग आहे.