या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भाग पांचवा.

                    ----------------------
                   मूळकिंमतीची मीमांसा.
                    ------------------------

मागील भागांत बाजारकिंमत व मूळकिंमत यांमधला फरक सांगितला. ज्या किंमतीसभोंवतीं बाजारभाव अगर बाजारकिंमत याचें आंदोलन चालतें ती मूळ-किंमत होय. बाजार-किंमतही रोज रोज-नव्हे घटकोघटकीं- बदलणारी किंमत होय, तर मूळकिंमत ही त्या मानानें स्थिर असलेली किंमत होय. बाजारकिंमत ही तात्पुरत्या व चलबिचल होणा-या कारणावर अवलंबून असते व तीं कारणें म्हणजे मागणी व पुरवठा हीं होत. व त्याचा मागल्या भागांत विचार केला आहे. या भागांत मूळकिंमतीच्या कारणांचा विचार करावयाचा आहे. परंतु मूळ किंमत ही कशावर अवलंबून आहे हें शोधून काढण्याकरितां संपत्तिरूप सर्व मालाचें त्रिविध वर्गीकरण करणें अवश्यक आहे. कारण या तीन वर्गाच्या मूळ-किंमतीसंबंधी स्थिति भिन्न भिन्न आहे.

ज्याला अर्थशास्त्रांत संपत्ति म्हणतात अशा वस्तूंचे मालाचे अगर पदार्थाचे तीन वर्ग पडतात. निरनिराळ्या कारणांनीं ज्या वस्तूंची संख्या मर्यादित आहे इतकेंच नाहीं, परंतु ही संख्या मानवी श्रमांनीं वाढविणें अशक्य आहे अशा वस्तूचा पहिला वर्ग होय. उदाहरणार्थ, एखाद्या मयत चित्रकाराच्या हातचीं चित्रें किंवा मयत मूर्तिकाराच्या हातच्या मूर्ति; प्रसिद्ध मुत्सद्यांच्या हातचीं पत्रें, कवींच्या हातांनीं लिहिलेल्या कवितेची मूळ प्रत, जुन्या काळचीं नाणीं, ताम्रपट, सनदा वगैरे; सारांश, पुराणवस्तुसंग्रहांतील बहुतेक वस्तू याच सदराखालीं येतात. कारण या वस्तू नवीन निर्माण करतां येणें मुळीं अशक्य आहे; अशोकराजाचे ताम्रपट अगर लेख आतां नवीन होणें शक्य नाहीं; आतांपर्यंत सापडले नाहीत असे लेख अगर ताम्रपट आता सापडू शकतील हें खरें; तरी पण एखाद्या राजाचे सर्व शिलालेखव ताम्रपट सांपडले म्हणजे झाले. मग त्यापुढें त्यांची संख्या वाढणे शक्य