या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३१२] सामान्य मजुरीचा दर असतो व तसेंच व्याजाचा व नफ्याचाही एक सामान्य दर असतो. यामुळे सामान्य दराप्रमाणें संपत्ति उत्पादन करणारांना मोबदला मिळाल्याखेरीज ते संपत्ति उत्पादनच करणार नाहींत. ह्मणजे संपत्तीची मूळकिंमत ही वस्तूची स्वाभाविक किंमत झाली. इतकी किंमत वस्तूला पडलीच पाहिजे. कारण वस्तूची किंमत याखालीं गेल्यास वस्तू निर्माण होण्याचेंच बंद होईल. आतां या किंमतीसंबंधानें वर निर्दिष्ट केलेल्या दुस-या व तिस-या वर्गामध्यें मोठा फरक आहे तो कसा पडतो हें पाहूं. संपत्तीचा दुसरा वर्ग कृषिज व खनिज संपत्तीचा होय, हें वर सांगितलेंच आहे आतां या वर्गांतील पदार्थांना समाजाच्या सुधारलेल्या अवस्थेंत उतरत्या पैदाशीचा नियम लागू असतो, असें दुस-या पुस्तकांत दाखविलें आहे. ह्मणजे जमिनीपासून किंवा खाणींतून संपत्ति उत्पन्न करण्यास जास्त जास्त खर्च लागत जातो. अर्थात् देशांत जमीन निरनिराळ्या सुपीकतेची असते व यामुळें एक माल उत्पन्न करण्यास निरनिराळा खर्च पड़तो व हा उत्पन्नाचा खर्च जरी निरनिराळा असला तरी एकाच गुणाच्या मालाची किंमत बाजारांत सारखी असते; यामुळे जास्त सुपीक जमिनीच्या मालावर साधारण सुपीक जमिनीच्या मालापेक्षां जास्त फायदा असतो. हा फायदा अगर सुपीक व कमीसुपीक जमिनीच्या उत्पन्नांतील अंतर ह्मणजे भाडें होय, हें मागें दाखविलेंच आहे. आतां कोणत्या सुपीकतेची जमीन लागवडीस आणावयाची हें धान्याच्या मागणींवर अवलंबून असतें. देशांत लोकसंख्या जास्त झाली ह्मणजे कृषिज व खनिज मालाच्या बाबतींत मूळकिंमत ही ज्या जमिनीला सर्वांत जास्त खर्च लागतो त्या जमिनीच्या उत्पन्नाच्या खर्चावर अवलंबून असतें; व देशाच्या वाढीबरोबर लागवडीची धार खालीं खालीं जाते व धान्याची मूळ किंमत वाढत जाते व त्या मानानें बाजारकिंमतही वाढत जाते, हें उघड आहे.