या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३१४ ] चा खर्च हातमागाच्या कापडापेक्षां कमी असतो व म्हणून गिरणींतील कापडाची मूळ-किंमत कमी असते व बाजारभाव या किंमतींबरोबर असतो. व हातमागांच्या विणकरांना त्याच किंमतींने आपला माल विकावा लागतो व म्हणून त्यांचा आंतबट्ट्याचा व्यापार होतो व कालेंकरून हा धंदा नाहींसा होत जातो. हिंदुस्थानांतील कापडाचा धंदा नाहीसा होण्याचें कारण इंग्लंडांतील गिरणींतील कापड होय, हें सर्वश्रुतच आहे. गिरणींतील कापडाची मूळ-किंमत हातमागाच्या कापडापेक्षां कमी असे; कारण गिरणींतील कापडाच्या उत्पत्तीचा खर्च हातमागांच्या कापडाच्या उत्पत्तीच्या खर्चापेक्षां कमी असे व बाजारभाव स्वस्त मूळकिंमतीबरोबर होते. तेव्हां या तिसऱ्या वर्गामधल्या संपत्तीच्या मूळकिंमतीची मीमांसा अगदीं सोपी आहे. सर्वांत स्वस्तपणें माल तयार करण्याच्या पद्धतीवर मूळकिंमत अवलंबून असते व जो कारखानदार प्रथमतः अशी स्वस्त तऱ्हा शोधून काढतो त्याला पुष्कळ फायदा होतो. परंतु कालेंकरून भांडवलाच्या चढाओढीनें सर्व कारखाने नवीन पद्धतीचे होतात व पुन्हां धंद्यांतील मालाच्या उत्पत्तीचा खर्च एकाच पायरीवर येऊन ठेपतो. अर्थात् कृषिज व खनिज मालाप्रमाणें खर्चाच्या निरानराळ्या पाय-या कायमच्या राहत नाहींत. तर सर्वात स्वस्त त-हेनें माल उत्पन्न करण्याची त-हा सार्वत्रिक होते व यावरून मूळकिंमत ठरते व त्याबरोबर बाजार-किंमत असते. ह्मणजे या वर्गामधील मालावर मागणीचा दुस-या वर्गांतील मालाच्या मागणीपेक्षा निराळा परिणाम होतो. दुसऱ्या वर्गांत मालाची मागणी वाढली ह्मणजे लागवडीची धार खाली जाते. अर्थात् मालाच्या उत्पत्तीचा खर्च वाढतो; त्या मानानें मूळ-किंमत वाढते व मूळ-किंमतीवर बाजारकिंमत अवलंबून असते ह्मणून बाजारकिंमतही कायमची वाढते. परंतु कारखान्यांतल्या मालावर उलट परिणाम होतो ह्मणजे जसजशी यंत्रांमध्यें सुधारणा होत जाते त्या त्या मानानें उत्पादन-खर्च कमी होतो व मूळकिंमत कमी होते. वरील विवेचनावरून वस्तूच्या बाजार-किंमती व मूळ-किंमती या कशावर अवलंबून आहेत हे दिसून येईल. बाजार-किंमती अगर मूळ-किंमती या प्रत्यक्ष व्यवहारांत निरनिराळ्या असतात अशी मात्र गोष्ट नाही. मूळ-किमतीची कल्पना खरोखरी निवळ तात्विक आहे. प्रत्यक्ष व्यवहारांत