या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३१६] पुष्कळच अडचणी व गैरसोई असतात; व त्या पैशानें अदृलाबदला होऊं लागल्या म्हणजे नाहींशा होतात. खरोखरी या अडचणी नाहींशा करण्यास पैसा अस्तित्वांत येतो. तेव्हां विनिमयामध्यें पैशाचा कार्यभाग समजण्याकरितां ऐनजिनसी व्यवहारांतील अडचणी काय आहेत हें प्रथमतः पाहिलें पाहिजे.

 ऐनजिनसी व्यवहारांतील पहिली अडचण सवदा जुळण्याची आहे. एका मनुष्याजवळ त्याच्या गरजेपेक्षां जास्त धान्य आहे व त्याला कपडा घ्यावयाचा आहे. आतां या मनुष्याला असा दुसरा मनुष्य सांपडला पाहिजे का, ज्याच्याजवळ कपडा फाजील आहे परंतु ज्याला धान्य पाहिजे आहे, परंतु ज्याच्याजवळ कपडा जास्त आहे त्याचेजवळ धान्य असल्यामुळें त्याला धान्याची गरज नसेल; तर त्याला जोडयाची गरज असेल.त्याला बरोबर असा मनुष्य शोधून काढला पाहिजे कीं, त्याला हवी असणारी वस्तु फाजील आहे व ज्याला पहिल्या मनुष्याच्याजवळ फाजील असलेल्या वस्तूची गरज आहे. म्हणजे ऐनजिनसी व्यवहारामध्यें माणसांच्या वासनांमध्यें एक प्रकारचा संवाद लागतो व तो या पद्धतींत सांपडणें कठिण असतें.

ऐनजिनसी व्यवहारांतील दुसरी अडचण म्हणजे मोल ठरविण्याची अडचण. वरील उदाहरणांत त्या मनुष्याला आपल्याला पाहिजे असा मनुष्य सांपडला अशी कल्पना केली तरी एका कपड्याबद्दल किती धान्य द्यावयाचें हें ठरविणें कठिण आहे.

  ऐनजिनसी व्यवहारांतील तिसरी अडचण ह्मणजे विभाग करण्याच्या साधनाची अडचण होय. धान्य, सोनें, वगैरे पदार्थ विभागतां येतील; परंतु शिंप्याने तयार केलेला कोट कांही फाडतां येणार नाही व जर त्या शिंप्याला कोट देऊन जोड घ्यावयाचा असेल तर येथें ऐनजिनसी व्यवहार होण्यास पंचाईत पडेल.
  ऐनजिनसी व्यवहारांतील या अडचणी दूर करण्याकरितां पैशाची जरुरी असते व असा पैसा औद्योगिक प्रगतीच्या मार्गाला लागलेल्या समाजांत अवश्यमेव अस्तित्वांत येतो. व पैशाने अदलाबदल होऊं लागली म्हणजे तिला निष्कव्यवहार-पद्धति म्हणतात.