या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३१७] तेव्हां आतां पैसा ह्मणजे काय ? हा प्रश्न पुढें उभा राहतो. या प्रश्नाचें उत्तर देणें फार कठिण आहे. कारण निरनिराळ्या देशांत व समाजाच्या निरनिराव्या अवस्थांमध्यें अगदीं भिन्न भिन्न वस्तू पैसा ह्मणून वापरण्यांत येतात. कोठे कातड्याचे तुकडे तर कोठं चहाचे तिकोनी तुकडे; कोठें गुरेंढोरें तर कोठें गुलाम; कोठे शिंपा तर कोठें कवड्या; कोठें हस्तिदंत तर कोठें घडीव दगड, कोठें धान्य तर कोठें तेल; कोठें बदाम तर कोठें काकाचें फळ; कोठें तंबाखू तर कोठें सुंठ, कोठें तांबडीं पिसें तर कोठें हात-या;सारांश, कल्पनातीत अशा भिन्न भिन्न पदार्थांचा पैशासारखा उपयोग केलेला दृष्टीस पडतो. परंतु हे सर्व पैशाचे प्रकार साधारणतः समाजाच्या बाल्यावस्थेंतीलच आहेत हें कबूल करणें भाग आहे. देशाची औद्योगिक बाबतींत वाढ होऊं लागली म्हणजे धातूचा पैशाकडे उपयोग होऊं लागतो. लोखंड, तांबें वगैरे धातूचे पैसे पुष्कळ देशांत दिसून येतात. परंतु जगांत आजपर्यंत जितके जितके पदार्थ पैसा ह्मणून वापरले आहेत त्यामध्यें सोनें, रुपें यांचा सर्वांत वर नंबर आहे. औद्योगिक प्रगतीबरोबर इतर सर्व पदार्थ मागें पड़न सोनें-रुपें या धातूच पैशाची जागा पटकावतात असा सार्वत्रिक नियम दिसून येतो. असें कां होतें याचा उल्लेख लवकरच करावयाचा आहे. असो. तेव्हां अशा भिन्न भिन्न पदार्थामध्यें सामान्य गुण सांपडणें दुरापास्त आहे. म्हणून पैशाची पैसाभूत पदार्थांमधील सामान्य गुणावरून व्याख्या करणें जवळजवळ अशक्य आहे व ह्मणूनच कांहीं अर्थशास्त्रकारांनीं पैशाची व्याख्या करण्याची एक निराळीच तोड काढिली आहे. ती अशी:—पैसा अदलाबदलींत जीं कामें करतो अगर पैशाच्या विनिमयामध्यें जो कार्यभाग आहे त्यावरून पैशाची व्याख्या करावयाची. या त-हेनें पैशाचा कार्यभाग जो पदार्थ करतो तो पैसा, अशी पैशाची मोघम व्याख्या ठरते. परंतु आतां पैशाचा कार्यभाग कोणता हा प्रश्न उत्पन्न होतो. मागें ऐनजिनसी व्यवहाराच्या ज्या अडचणी सांगितल्या त्यावरून पैशाचा कार्यभाग ठरविणें सोपं आहे. एका दृष्टीनें ऐनजिनसी व्यवहाराच्या अडचणी नाहीशा करणें हा पैशाचा खरा कार्यभाग आहे. या दृष्टीनें पैशाचे मुख्य दोन कार्यभाग होतात. पहिला कार्यभाग ह्मणजे विनिमयसामान्य हा होय, व दुसरा मोलाचें सर्वसाधारण परिमाण