या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाग नववा.

                  हिंदुस्थानांतील नाणीं व त्यांची चलनपद्धति.

हिंदुस्थानच्या सुधारणेच्या अत्यंत पुराणत्वामुळें व हिंदुस्थानच्या पूर्वकाळच्या इतिहासाच्या अभावामुळें हिंदुस्थानांतील नाणीं हा विषय अर्थशास्त्राचा न राहतां तो हल्लीं पुराणवस्तुसंशोधनशास्त्रापैकीं एक महत्त्वाचा भाग आहे; परंतु आपल्याला या दृष्टीनें येथें मुळींच विचार करावयाचा नाहीं. एवढें खरें कीं, नाण्याची कल्पना हिंदुस्थानांत ब-याच जुन्या काळापासून ठाऊक आहे यांत शंका नाहीं. संस्कृतांतील आद्यग्रंथ जो ऋग्वेद त्यामध्यें नाण्याची कल्पना दिसत नाहीं. ऋग्वेदकाळच्या ऋषींना सोनें व लोखंड या धातु माहिती होत्या ही गोट निर्विवाद आहे. आता त्याचा पैशासारखा उपयोग होईल किंवा नाहीं, हृें सांगतां येणें कठीण आहे. परंतु इतर देशांत ज्याप्रमाणें पैशाची उत्क्रांति होत गेली तशी येथेंही झाली असली पाहिजे हें उघड आहे. गोपालवृक्ति समाजांत गुरें हीं पैशासारखी उपयोजिलीं जातात असें समाजशास्र सांगतें व संस्कृत भाषेतील कांहीं कांहीं वाक्यांवरून त्या स्थितींतून आर्य लोक गेले असले पाहिजेत असें उघड उघड दिसतें. 'इतर वस्तूंचें मोल अमुक गाई होतें किंवा अमुक गाई पारितोषिक मिळालें, अशा प्रकारचे शब्दप्रयोग जुन्या काळच्या संस्कृत वाङ्मयांत सांपडतात. यावरून आर्य लोक गोपालवृत्तीमधून गेले असले पाहिजेत व त्याकाळीं गुरांचा पैशासारखा उपयोग होत असला पाहिजे इतकें अनुमान काढण्यास हरकत नाहीं. परंतु सोन्याच्या धातूची माहिती झाल्यापासून लवकरच सोनें पैशासारखें उपयोगांत येऊं लागलें असलें पाहिजे. अशोक राजाच्या कारकीदींमध्यें नाण्याचा प्रसार चांगलाच झाला होता. कारण त्याच्या काळचीं पुष्कळ नाणीं सांपडलेलीं आहेत. तेव्हां सुमारें इसवी सनाच्यापूर्वी तीनशें वर्षीपासून हिंदुस्थानांत सोन्यारुप्याच्या नाण्यांचा प्रचार दिधून येतो यांत शंका नाहीं.