या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३४९]

शिवाजीच्या काळीं दक्षिणेंत होन जास्त प्रचारांत असत असें वाटतें. कारण शिवाजीच्या अष्टप्रधानांचे पगार होनांत ठरलेले होते असें बखरींवरून दिसतें. शिवाजीला राज्य मिळाल्यावर त्यानें आपल्या नांवाचे पेसे अगर शिवराई पाडले. शिवाजीनें आपल्या नांवाचा रुपयाही पाडला होता; परंतु या दोन नाण्यांपैकीं रुपया फार रूढ झाला नाही. परंतु पैसा मात्र सर्व दक्षिणमहाराष्ट्रांत व कर्नाटकांत, इतकेंच नव्हे तर जिकडे जिकडे मराठी राज्याचा विस्तार पसरला त्या सर्व प्रांतांत, शिवराई म्हणून पसरला व पूर्णपणें रूढ झाला. मराठेशाहीमध्यें टांकसाळीचें काम सरकारनें हातीं घेतलें नाहीं. टांकसाळी खासगी लोकांच्याच असत. तरी पण टांकसाळी काढण्यास सरकारी परवानगी लागे. महाराष्ट्रांतही त्या काळीं पुष्कळ शिक्यांची रुप्याचीं व सोन्याचीं नाणीं चालत असत; परंतु रुपयाचा प्रचार जास्त दिसतो.

एथपर्यंत हिंदुस्थानांतील चलनपद्धतीचा संक्षिप्त इतिहास दिला. या सर्व काळांत हिंदुस्थानची चलनपद्धति हा शब्दप्रयोग फारसा अन्वर्थक नव्हता. सर्व देशांत सोन्यारुप्याचीं नाणीं चालत एबढ़ें खरें; परंतु निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळीं नाणीं असत व त्यांचीं वजनें, आकार वगैरेमध्येंही हवे तितके भेद असत. तसेंच निरनिराळ्या प्रांतांच्या नाण्यांत हिणकसपणाही कमजास्त असे. यामुळें त्या काळीं चलनपद्धतीला व्यवस्थेचें व ठराविक स्वरूप येणें शक्य नव्हतें. नाणीं या प्रमाणें विविध असल्यामुळें नाणीं तोलून व पारखून घेण्याची पद्धति सुरू होती. परंतु ब्रिटिश अंमलांत हिंदुस्थानांत आजपर्यंत न घडुन आलेली गोष्ट घडून आली. म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व द्वारकेपासून पुरीपर्यंत हा सर्व अवाढव्य देश एकाच राजकीय छत्राखालीं आला व तेव्हांपासून हिंदुस्थानची व्यवस्थित चलनपद्धति सुरू होणें शक्य झालें. पहिल्यापासूनच कंपनी रुपये पाडी व कंपनीचे रुपये योग्य वजनाचे व योग्य कसाचे असल्यामुळे पाहिल्यापासून लोकप्रिय असत व सर्व लोक कंपनीचे रुपये तोलल्याखेरीज निवळ मोजून घेण्यास तयार असत. कारण त्यांत लबाडी असावयाची नाहीं अशी लोकांची खात्री होती. पुढें कंपनीच्या हातीं सर्व हिंदुस्थानचींच राज्यसूत्रें आली व त्यांच्या राज्याचा वृक्ष सर्व हिंदुस्थानभर पसरला. तेव्हां अर्धवट. व अव्यवस्थित द्विचलनपद्धति असमाधान