या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३५४]

बरोवर धातूचें नाणेंसुद्धां गैरसोयीचें वाटू लागतें व कागदी चलनी नोटांसारख्या अत्यंत हलक्या पोस्टानें हव्या तिकडे पाठवितां येणा-या सहसा चोरले न जाणा-या व झीज व नाश न होणा-या अशा कागदी चलनाची अवश्यकता भासूं लागते व सरकार व इतर संस्था देशांत कागदी चलन सुरू करतात. तेव्हां आतां या कागदी चलनाचीं तत्वें काय; त्याचे प्रकार कोणते; त्याचें स्वरूप काय, वगैरे प्रश्नांचा विचार एका निराळ्या भागांत करणें इष्ट आहे. परंतु या विवेचनास लागण्यापूर्वी पैशासंबंधींच्या आणखी एका महत्वाच्या प्रश्नाचा विचार करावयाचा राहिला आहे. त्याचेंही विवेचन एका स्वतंत्र भागांतच करणें सोईचें होईल.

                      ----------------------
                         भाग दहावा.
                      ---------------------
               धात्वात्मक पैशाच्या मोलाची मीमांसा.
                      ---------------------

पैशाच्या द्रव्यामधील गुणसप्तकाचा विचार करतांना असें सांगितलें होतें कीं, पैशाच्या द्रव्यांत उपयुक्ता मोल व मोलाची स्थिरता हे गुण पाहिजेत. कारण ज्याच्यायोगानें सर्व पदार्थाचें मोल मोजलें जाणार, जो सर्व पदार्थांचा विनिमयसामान्य होणार, जो कालांतरानें पु-या होणाऱ्या देवघेवीचें परिमाण होणार व शेवटीं जो संपत्ति शिल्लक टाकण्याचें एक साधन बनणार,असा पैसा मोलवान् पाहिजे इतकेंच नाहीं तर त्याचें मोल स्थिरही पाहिजे हें उघड आहे. परंतु मानवी गोष्टींत आत्यंतिक स्थिरता कोठेंच नसते. ती फक्त सापेक्षच आहे. म्हणजे इतर पदार्थाच्या मोलांत जितका जलद फरक होतो तितक्या जलद पैशाच्या मोलांत फरक होऊं नये अशा प्रकारचें पैशाचें द्रव्य असावें असा अर्थ घ्यावयाचा. तेव्हां पैशाचें मोल म्हणजे काय व तें मोल कशावर अवलंबून आहे या प्रश्नाचें विवेचन आतां क्रमप्राप्त आहे.

इतर सर्व पदार्थांच्यासंबंधानें किंमत व मोल अशा दोन भिन्न भिन्न कल्पना होतात. पदार्थाचें मोल म्हणजे एका पदार्थाचें इतर पदार्थांशी विनिमयपरिमाण व पदार्थाची किंमत म्हणजे त्याचें पैशाशीं विनि-